November 1, 2025

ऊर्जा सुरक्षिततेसाठी सौरऊर्जा सक्षम पर्याय : परेश भागवत

0
20240210_184647

कोल्हापूर : सूर्य हा अनंतत्व प्रकाश ऊर्जेचा स्रोत आहे. पारंपारिक ऊर्जासाठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. तेंव्हा औष्णिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून भविष्यात ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णता, सुरक्षितता साध्य करण्यासाठी सौरऊर्जा हा एक सक्षम व स्वच्छ ऊर्जेचा पर्याय आहे,असे प्रतिपादन महवितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले.

केंद्रसरकारने 2030 पर्यंत 40 टक्केपर्यंत ऊर्जेची निर्मिती गैर-जीवाश्म ऊर्जास्त्रोताव्दारे करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. पंतप्रधान सुर्योदय योजनेतून 1 कोटी घरांवर सोलर यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण व महाराष्ट्र सोलार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर रुफ टॉप यंत्रणा या विषयावर रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ, नितीन कुलकर्णी, नोवासीस ग्रीन एनर्जी प्रा. लि. चे महाव्यवस्थापक प्रतिक जोशी, ईव्हॉल्व एनर्जी ग्रुपचे वरिष्ठ अभियंता अरुण राज यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना भागवत म्हणाले की, वातावरणातील बदलांच्या परिणामस्वरूप कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शाश्वत व स्वच्छ ऊर्जेसाठी सौरऊर्जा हे उद्याचे भविष्य आहे. ऊर्जा स्वयंपूर्णता ही ऊर्जा सुरक्षा, अर्थिक विकास व पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक आहे. आगामी काळात सौरऊर्जा निर्मिती व वापराच्या माध्यमातून भारत जगाला दिशादर्शक ठरेल. नुकतेच केंद्रसरकारने निर्धारीत केलेल्या 1 कोटी घरांवर सोलरच्या उद्दिष्टपूर्तीत कोल्हापूरचे योगदान लक्षणीय असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रूफ टॉप सोलर ग्राहकांना कालमर्यादित व विश्वासार्ह सेवा मिळावी. महावितरण व सोलर एजन्सी यांच्यातील परस्पर समन्वय वाढीस लागावा. यादृष्टीने वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या तक्रारी,अडचणी व त्यावरील उपाययोजना याविषयी उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांनी महत्वपूर्ण सादरीकरण केले.

प्रतिक जोशी यांनी सोलर पीव्ही मोड्युल तंत्रज्ञान प्रगतीची तर अरुण राज यांनी सोलर इन्व्हर्टरबद्दल माहिती दिली. ‘मास्मा’चे माजी अध्यक्ष रोहन उपासनी, संजय देशमुख यांची समायोचीत मनोगते झाली. महावितरणात ‘मास्मा’कडून रुफ टॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्यात येणार आहे. त्याद्वारे अभियंत्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण लाभून पंतप्रधान सुर्योदय योजनेस गती मिळेल. चर्चासत्राच्या समारोप सत्रात एमएनआरई टप्पा 2 मधील कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आले.

यावेळी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी, सोलर पुरवठादार, सभासद उपस्थित होते. प्रशिक्षण केंद्र समन्वयक रेणुका ढमाळ,अतुल होनोळे, प्रदिप खाडे यांनी चर्चासत्र यशस्वीतेसाठी समन्वय साधला. सूत्रसंचालन इंद्रजित शिरगावकर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page