सेनापती कापशीत विद्युत सुरक्षा प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर : मुरगुड उपविभागात ३३/११ केव्ही कापशी उपकेंद्रामध्ये महावितरणचे कर्मचारी व ग्राहक यांच्यासाठी विद्युत सुरक्षा प्रशिक्षण संपन्न झाले.
लघु प्रशिक्षण केंद्र समन्वयक रेणुका ढमाळ, उपविभागीय अभियंता सचिन जगताप यांनी मार्गदर्शन केले. सचिन जगताप यांनी काम करत असताना कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या नजरचुकीने किंवा निष्काळजीपणाने घडत असलेल्या अपघाताबाबत व कारणाबद्दल विश्लेषण केले. रेणुका ढमाळ यांनी अवधूत आठवले या एका ग्राहकाच्या घरी जाऊन विद्युत उपकरणे वापरताना कोणती काळजी घ्यावी. तसेच विद्युत उपकरणांसाठी आरसीसीबी किती आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून दिले.
प्रशिक्षणादरम्यान सहाय्यक अभियंता रश्मी पाटील लिखित उपकार्यकारी अभियंता संगीता कुसुरकर यांनी अभिवाचन केलेल्या ‘पत्रास कारण की’ या विद्युत अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनमित्राच्या कुटुंबाची हृदयद्रावक परिस्थितीची ध्वनीफीत ऐकवण्यात आली.
सर्वांनी सुरक्षिततेबाबत प्रतिज्ञा घेतली. विद्युत सुरक्षिततेसाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू, असा विश्वास मुरगूड उपकार्यकारी अभियंता हेमंत येडगे यांनी व्यक्त केला. उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सहाय्यक अभियंता प्रशांत करनुरकर यांनी आभार मानले.महेश शेंडे यांनी नियोजन पाहिले.
