November 1, 2025

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

0
IMG-20240821-WA0168

कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर. हलगीचा निनाद. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. ताराराणी चौकात आल्यावर सर्वप्रथम स्वप्निलने महाराणी ताराराणी यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रीडाप्रेमी तसेच कोल्हापूरकर मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.
ताराराणी चौकातून सुरु झालेली मिरवणुक मध्यवर्ती बसस्थानक – व्हीनस कॉर्नर मार्गे -दसरा चौकात मार्गक्रमणा झाली. ढोल -ताशांचा गजर व हलगीच्या निनादाने वातावरण यांना दुमदुमुन गेले.
सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला, हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन उभे राहिलेले विद्यार्थी, हेलिकॉप्टर मधून होणाऱ्या पुष्पवृष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रचंड उत्साहाने केलेल्या स्वागताने स्वप्निल कुसाळे भारावून गेला. आपल्या मातीत झालेल्या सन्मानाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.
व्हीनस कॉर्नर येथे मिरवणुक आल्यानंतर स्वप्नीलने छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर मिरवणुक दसरा चौकात आल्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला स्वप्निलने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.. तसेच राष्ट्रध्वज लपेटून उपस्थितांना वंदन केले, यावेळी उपस्थितांनी प्रचंड जल्लोष करत टाळ्या, शिट्ट्या व घोषणांनी त्याला दाद दिली.

झेंडूच्या फुलांच्या माळांनी अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या वन विभागाच्या वाहनातून स्वप्निलची मिरवणुक काढण्यात आली. या वाहनात स्वप्निलची आई अनिता, वडील सुरेश कुसाळे यांच्यासह कुटुंबिय व कोच.. त्याच्यासोबत होत्या. मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्वप्निलचे कटआऊटस् लावण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गावर स्वप्निलची मिरवणुक असल्यामुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापुरकरांच्या अलोट गर्दीत स्वप्निल कुसाळे याची भव्य आणि जंगी मिरवणुक पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page