November 1, 2025

नागाव येथील कबड्डी स्पर्धेत हेरवाडचा राजमुद्रा संघ अजिंक्य

0
20240528_143144

शिरोली : नागाव, ता. हातकणंगले येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमुद्रा हेरवाडच्या राजमुद्रा या कबड्डी संघाने अजिंक्य पद पटकाविले. त्यांस पंधरा हजार रुपये रोख व चषक असे बक्षीस त्यांना देण्यात आले. राजमुद्रा हेरवाडने शिवगर्जना राशिवडे या संघावर २० विरुद्ध २४ अशी आघाडी घेत चार गुणांनी हे अजिंक्यपद पटकावले. शिवगर्जना राशिवडे या संघाला या स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान मिळाले. त्यांना दहा हजार रुपये रोख व चषक असे बक्षीस देण्यात आले. सर्वेश्वर संघ पुलाची शिरोली यांना तृतीय क्रमांक मिळाला. सात हजार रुपये रोख व चषक असे बक्षीस त्यांना देण्यात आले.
नागाव ( ता. हातकणंगले ) येथील सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे ४५ किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ मैदानावर या स्पर्धा पार पडल्या.. पहिला उपांत्य सामना पुलाची शिरोली येथील सर्वेश्वर संघाविरुद्ध राजमुद्रा संघाशी झाला. यामध्ये हेरवाडच्या राजमुद्रा संघाने सर्वेश्वरवर १५ विरुद्ध २६ गुणांची आघाडी घेत नऊ गुणांनी हा सामना जिंकला. दुसरा उपांत्य सामना शिवगर्जना राशिवडे विरुद्ध शिवमुद्रा कौलव यांच्यामध्ये झाला. हा सामना शिवगर्जना राशिवडेने २१ विरुद्ध २४ गुणांची आघाडी घेत तीन गुणांनी जिंकला.
या व्यतिरिक्त सिद्धार्थ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संघाला आदर्श संघ, दिगंबर कांबळे उत्कृष्ट चढाई, रोहन जांभळे उत्कृष्ट खेळाडू, ओम पाटील उत्कृष्ट पकड अशी विविध बक्षिसे देण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा होत आहे. सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे सदस्य संतोष घाडगे, नितीन लंबे, माणिक सावंत व लखन कांबळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
नागाव विकास आघाडीचे प्रमुख विजय पाटील यांच्या हस्ते अंतिम सामन्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नागावची उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील, सदाशिव साळोखे मनोज घारुगे, नंदकुमार कांबळे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश रेळेकर, अनिल शिंदे, श्रीराम मेटलचे बंडा डाफळे, कुबेर ट्रान्सपोर्टचे अनिल तराळ, सचिन नागावकर, मोहन कांबळे, , शाहुल कांबळे, युवराज बाचणे, विकास बाचणे, शिवरुद्र हिरेमठ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page