November 2, 2025

विशाळगड का पेटला? अजूनही का धुमसतोय?

0
b4ed6e6235db6cf637ecf5ae8aa9de4d1721121287716954_original

कोल्हापूर  (विजय पोवार ) : छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील सर्व गड-किल्ले स्वच्छ, सुंदर, ऐतिहासिक महत्त्व जपणारे, प्रेरणादायी आहेत. पण याला गेली अनेक वर्षे अपवाद ठरला होता कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड. अतिक्रमण, पशुपक्ष्यांचे बळी, मांसाहार, मद्यपान, पार्ट्या, जुगाराचे अड्डे, गुन्हेगारी ते अतिरेक्यांचे आश्रयस्थान इथपर्यंत विशालगडाची चर्चा होऊ लागली होती. हे सर्व थांबले पाहिजे ही शिवभक्तांची भावना होती. त्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला.  विशाळगडावरील अनुचित प्रकार हळूहळू कमी होऊ लागले. पण ठोस कारवाईला शासकीय यंत्रणेची दिरंगाई, राजकीय हस्तक्षेप, जातीय तेढ यामुळे विशाळगडावरील वातावरण बिघडू लागले. अखेर विशाळगड पेटला आणि आता धुमसत आहे.
छत्रपती शिवरायांनी कोल्हापुर म्हणजेच करवीर इलाख्यातून पन्हाळगडावरून अनेक वर्षे स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला वेढा, पावनखिंड (घोडखिंड)ची लढाई, बाजीप्रभू देशपांडे,वीर शिवा काशीद यांचे बलिदान, विशाळगडावरील तोफांची सलामी हा इतिहास आजही अंगावर शहारे आणणारा तितकाच प्रेरणादायी आहे. त्यानंतर छत्रपती ताराराणी यांनी स्थापन केलेल्या करवीर संस्थानातही विशाळगड तितकाच महत्वाचा होता.
हा सर्व ज्वलंत इतिहास असताना विशाळगडावर मात्र अलीकडील काळात तेथील दर्ग्याच्या वापर करून लोकांच्या भावनेशी खेळ सुरू झाला. तसे विशाळगडावर एक शंभू महादेवाचे हे मंदिर आहे पण ते कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिले. विशाळगडाचे अनेक बुरुज वर्षानुवर्षी धडाधड ढासळत राहिले. पण दर्ग्याच्या नावावर प्रथम बेडीचे नवस, ते फेडण्याच्या निमित्ताने बेडी तोडणे, बकरी, कोंबड्याचे बळी, नैवेद्याच्या नावावर मांसाहार, मांसाहार आहे म्हणून मद्यपान, परवानगी नसतानाही मद्याची तस्करी, विक्री, त्यातून टाईमपास म्हणून रंगणारे जुगाराचे खेळ, पशुपक्ष्यांच्या कत्तली मुळे अनेक ठिकाणी रक्तामांसाचे सडे, प्राण्यांचे विखुरलेले, सडलेले अवशेष, गडावर येणाऱ्यांचे मलमूत्र, अस्वच्छता यामुळे दुर्गंधीचा असहनीय दर्प. ही सर्व परिस्थिती बदलण्याचे खरे आव्हान होते.
संभाजीराजेंनी जेव्हा विशाळगडावर भेट दिली तेव्हा हे विशाळगडाचे चित्र पाहून ते अस्वस्थ झाले पण ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांचे गड संवर्धनाचे काम सुरू होते. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात त्यांनी विशाळगड शुद्धीकरणाचा निर्णय घेतला. शिवभक्तांनी ही चांगला प्रतिसाद दिला. प्रामुख्याने विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला. तेथील अवैद्य व्यवसाय आणि अनुचित प्रकार थांबवण्यासाठी अतिक्रमणे हटविले पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शासकीय यंत्रणेला जागे केले. अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले. ते काढण्याचे आदेशही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पण हे सर्व कागदोपत्रीच राहिले. प्रत्यक्ष जागेवर कारवाई झालीच नाही.
प्रत्यक्ष गडावर १५८ तर खाली पायथ्याला १२ अतिक्रमणे असल्याचे शासन यंत्रणेने सिद्ध केले. यातील वरची ६ आणि खालचे १ अतिक्रमण न्यायप्रविष्ठ आहे. इतर सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश असताना शासकीय यंत्रणा कारवाई करत नाही म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमण हटावसाठी १४ जुलै रोजी ‘चलो विशाळगड’चा नारा दिला. आणि इथेच लागले या प्रकरणाला राजकीय आणि जातीय वळण.
१४ जुलै रोजी संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले. पण त्याचवेळी काही दंगलखोरानी विशाळगड जवळील गजापूर, मुसलमानवाडी येथील नागरी वस्तीवर हल्ला करून मुस्लिम कुटुंबाला लक्ष्य केले. घरंदारं, प्रापंचिक साहित्य, वाहने यांचे प्रचंड नुकसान झाले. बायका, मुले, वृद्ध भीतीने अक्षरश: कोलमडून गेले. वास्तविक ज्याचा अतिक्रमण विशालगडावरील गैर प्रकाराशी कोणताही संबंध नसलेले या हल्ल्यात होरपळले. वातावरण तणावपूर्ण बनले. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
इतके सर्व होऊनही अतिक्रमण काढण्याबाबत शासकीय यंत्रणात ढिम्मच होती. दंगलीचा प्रकार घडला याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याने अतिक्रमणे काढण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा असलेल्या पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड प्रकरण घडले. याचे राजकीय, जातीय पैलू हळूहळू स्पष्ट होत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू छत्रपती निवडून आले. अर्थातच त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा हाच होता. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी विचाराला छेद  देण्यासाठी काही शक्ती पुढे येत आहेत. विशाळगड प्रकरणाचा मुद्दा असाच तापत ठेवण्याच्या राजकीय लोकांचा डाव आहे. यात सर्वसामान्य जनता विशिष्ट समाज होरपळत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि व्यक्ती आता सोयीची भूमिका घेत आहेत. आरोप, प्रत्यारोप होत आहेत. यातूनच काही जुन्या नव्या गोष्टी पुढे येत आहेत. संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी भूमिका घेतली. त्यापूर्वीच त्यांनी खासदार शाहू महाराज यांचेशी चर्चा केली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घडवून आणतो असे सांगितले. तसे खा. शाहू महाराजांनी प्रयत्नही केले. पण ना बैठक झाली, ना अतिक्रमण निघाले. अखेर संभाजीराजे विशाळगडावर निघाले आणि गजापूर भागात दंगल घडली.
ही दंगल घडल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली. अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तसेच पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. राजकीय नेत्यांची आडवाआडवी सुरू केली. इतकेच काय पत्रकारांचीही अडवणूक केली.
अतिक्रमण निर्मूलनाची प्रत्यक्ष कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली पण कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या दंगलीची नैतिक जबाबदारी संभाजीराजे छत्रपती यांनी घेतानाच राज्य सरकार, प्रशासन आणि काही राजकीय नेत्यांवर ही थेट आरोप केले. आदेश असूनही अतिक्रमण करण्यास दिरंगाई का केली? दंगल घडल्यानंतर अतिक्रमणे काढण्याची तत्परता कशी दाखवली? असे प्रश्न उपस्थित करतानाच स्थानिक आमदार विनय कोरे यांच्यावर ग्रामपंचायतमध्ये दबावाने नोंदी घालण्यास भाग पाडल्याचे, कारवाई रोखल्याचे आरोप केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या  भूमिकेवरही संभाजीराजेनी प्रश्न उपस्थित केले.
दंगल घडल्यानंतर खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील घटनास्थळी गेले. दंगल ग्रस्तांना दिलासा दिला. पण त्यांनाही पोलीस यंत्रणेने रोखण्याचा प्रयत्न केला.  तिकडे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी संभाजीराजे हे राजर्षी शाहूंच्या विचाराचे वारस आहेत का? खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील यांना घटनास्थळावर जाण्यास उशीर का झाला? असे प्रश्न उपस्थित करीत १९ जुलैला मुस्लिम समाजाला निदर्शने करण्याचे आवाहन केले. यातून हा मुद्दा तापत ठेवण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होत आहे. यावर कोल्हापुरात सद्भावना रॅलीचे आयोजन करून सामाजिक एकता जपण्याचा प्रयत्न होत आहे. यातूनही विशाळगड प्रकरणाच्या राजकीय लाभ कोणी घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेनेच सामंजस्याची आणि सावध भूमिका घेतली तर कोल्हापुरातील पुरोगामीत्व आणि सामाजिक सलोखा टिकून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page