धरणग्रस्तांच्या प्रचंड त्यागामुळेच जिल्ह्यातील सर्वांची समृद्धी : ना. हसन मुश्रीफ
कागल : काळम्मावाडी धरण बांधताना त्या परिसरातील धरणग्रस्तांनी असीम त्याग केला आहे. स्वतःच्या पै- पाहुणे आणि नातेवाईकांसह घरे- दारे, जमीन, देव-देवळे सोडून ते विस्थापित झाले आहेत. त्यांच्या प्रचंड त्यागामुळेच आम्हा सर्वांची समृद्धी झाली आहे, अशी कृतज्ञता वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे ही लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी आहे, असेही ती म्हणाले.
कसबा सांगाव येथील वाकी व वाडदे धरणग्रस्त वसाहतीमध्ये आयोजित सत्कार समारंभामध्ये पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. या वसाहतींमधील अनेक वर्षे प्रलंबित असलेले वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रूपांतरण. तसेच; त्यांचे स्वमालकीचे सातबारा पत्रक वाटप व विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे माजी संचालक अनिल पाटील होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, धरणग्रस्तांची काही जमीन तिकडे मूळ गावांमध्ये शिल्लक राहिलेली आहे. सरकार जमिनीचा ताबा देत नाही आणि मोबदलाही देत नाही. या प्रश्नासह धरणग्रस्तांच्या सर्वच समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या दोन्हीही वसाहतींमधील क्रीडांगण, विविध नवीन प्रकल्प, रस्ते व सोयी- सुविधांसाठी जिल्हाधिकारी, वनाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी अशी एकत्रित बैठक लवकरच लावू.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, धरणांसाठी सर्वस्वाचा त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच हरितक्रांतीमुळे झालेल्या समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत. आम्हा सर्वांवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी एवढा मोठा त्याग केला नसता तर कोल्हापूर जिल्ह्याची ही समृद्धी कधीच झाली नसती.
व्यासपीठावर तहसीलदार जितेंद्र इंगळे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे माजी संचालक अनिल पाटील, विठ्ठल चव्हाण, उमेश माळी, अजित शेटे, किरण पास्ते, अमोल माळी, शामराव जगताप, अर्चना लोखंडे, अर्चना चव्हाण, अमर शिंदे, अर्जुन माळी, रमेश हसुरे, अमर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत माजी उपसरपंच मारुती पाटील यांनी केले. राजेंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संतोष आवळे यांनी केले.
