सिंधी भाषा प्रसार, संवर्धनासाठी प्रयत्नाची गरज : डॉ. नरसिंगानी
गांधीनगर : सिंधी भाषेचा प्रसार आणि संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी समाजबांधवांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन सिंधू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. गोविंदराम नरसिंगाणी यांनी केले. साधू वासवानी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना नरसिंगानी बोलत होते.
सिंधी शाळा आता बंद झाल्याने सिंधी भाषेवर आक्रमण झाले असल्याचे सांगताना डॉ. नरसिंगाणी म्हणाले की सिंधी समाजातील प्रत्येकाला मातृभाषा म्हणून सिंधी भाषा अवगत असणे जरुरीचे आहे. सिंधू एज्युकेशन सोसायटीकडे सिंधी ग्रंथसंपदा उपलब्ध असून समाजातील तरुण वर्गाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी साधू वासवानी हायस्कूलची कवाडे खुली आहेत.
साधू वासवानी हायस्कूलमध्ये १९९५ ते २००५ या शैक्षणिक वर्षात शिकलेले सुमारे दोनशेहून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी या मेळाव्यास उपस्थित होत्या. माजी विद्यार्थी रिकी सचदेव यांनी स्वागत केले. मुरलीधर चंदवानी, प्रकाशलाल होतचंदानी, एस पी मंगीरमलानी, लालचंद नोतानी या शिक्षकांनी यावेळी मार्गदर्शन केले. संतोष राजपूत, लव अहुजा, रिकी सचदेव, किशोर बठेजा, अमर दर्यानी, संदीप राजपूत यांनी संयोजन केले. रवी खटेजा यांनी आभार मानले.
