शिरोलीच्या कचरा डेपोची जागा बदलू नये : शिवसेनेचे निवेदन
शिरोली : कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगाबाबत उद्योजकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यामध्ये शिरोली एमआयडीसीतील स्मॅक भवनजवळ असलेला शिरोली गावाचा कचरा डेपो हलवावा अशी मागणी केली. त्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्वरीत जिल्हाधिकाऱ्यांना हा कचरा डेपो हलवण्याचे आदेश दिले. पण शिरोलीतील कचरा टाकण्यासाठी सदर जागाच योग्य असल्याने उद्योग मंत्र्यांचा आदेश रद्द करावा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांचेकडे केली.
शिवसेनेचे माजी पं. स. सदस्य अनिल खवरे, मा. जि.प. सदस्य महेश चव्हाण, शहरप्रमुख राजकुमार पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. सदरची जागा काढून घेणार नसून कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा देणार असल्याचे यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी शिष्टमंडळाला सांगीतले.
शिरोली गावात नागरी वस्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ओला व सुखा कचरा मोठ्याप्रमाणात पडत आहे. त्यामुळे तो एकत्रित करून सगळा कचरा शिरोली गावाचीच जागा असून ती जागा शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये असून अडगळीच्या ठिकाणी असून गेली अनेक वर्षे शिरोली गावचा व शिरोली औद्योगिक वसाहतीचा कचरा टाकण्यात येत आहे सदरच्या कचऱ्याचे विघटन वेळोवेळी विघटन करून विल्हेवाट लावली जात आहे. तसेच सदरची जागा हि नागरी वस्ती पासून दूर आहे व तिथे कचरा टाकणे गावाच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य असून त्या जागेशिवाय पर्याय जागा नाही.
मौजे शिरोली गाव येथे असणारी औद्योगिक वसाहत स्थापन होत असताना शिरोली हद्दीतील जमीन ही एमआयडीसी साठी ३०० एकर हस्तांतर केला आहे यामुळे महाराष्टरातील उद्योगाना चालना मिळाली हि बाव स्वागतार्ह आहे. औद्योगिक वसाहतीमुळे व्यावसायाला चालना मिळाली तसेच त्यामुळे शिरोली गावाच्या विकासात वाढ झाली तसेच नागरी वस्तीही त्याच प्रमाणे झपाट्याने वाढ झाली. या नागरी वस्तीचा शिरोली ग्रामपंचायतीवर भार पडत आहे. दैनंदीन गटारीचे पाणी निचरा करणे, पिण्यासाठी पाणी पुरवठा करने, कचऱ्याचे विघटन, लाईट व्यवस्था करणे रस्ते दळण वळण करणे हि सर्वकामे, ग्रामपंचायातीला करणे क्रम प्राप्त झाले आहे. रोजचा कचरा पूर्वी गाव पद्धती प्रमाणे एकत्रित करून शेतामध्ये त्याचे खत म्हणून वापर करणे हे सुरु होते. पण हजारो कामगार शिरोली गावामध्ये वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे व गावात कोणत्याही प्रकारची रोगराई होणार नाही याची काळजी घेणे बंधन कारक आहे. त्यामुळे सदर जागे बाबत झालेला निर्णय रद्द करण्यात यावा व नागरिकाची काळजी घेण्यात यावी.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण, माजी उपसरपंच सुरेश यादव, शिवाजीराव पाटील, उपशहर प्रमुख अशोक खोत, हरी पुजारी, संतोष बाटे, अशोक कोळसे, राहूल चव्हाण आदी उपस्थित होते.
