श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचा ‘समग्र स्वयंपूर्ण ग्राामविकास’ उपक्रम
कोल्हापूर : प्रत्येक गाव स्वयंपूर्ण बनावे यासाठी सिद्धगिरी कणेरी मठानेरी मठाने आता ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृतिशील योजना सुरु केली आहे. ‘शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सांस्कृतिक’ या क्षेत्रात गावे सक्षम बनावीत, आणि त्याद्वारे उन्नती साधावी यासाठी ‘समग्र स्वयंपूर्ण ग्राामविकास’ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १०० गावे स्वयंपूर्ण करण्याचे ठरविले आहे. या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वीस गावांची निवड केली आहे.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले पहिल्या टप्प्यात कणेरी मठाच्या सभोवती असलेली ‘कणेरी, कणेरीवाडी, कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, गिरगांव, शेंडुर, दिंडनेर्ली, कंदलगाव, शेळकेवाडी, कांडगाव, नंदवाळ, गाडेगोंडवाडी, कारभारवाडी, सांगवडेवाडी, हलसवडे, दऱ्याचे वडगाव, व्हन्नूर, पिंपळगाव, एकोंडी, म्हाळुंगे, जैताळ’ ही गावे ग्राम विकास संकल्पनेसाठी निश्चित केली आहेत.
समग्र ग्रामविकास अंतर्गत या गावासाठी आठ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे.’असे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. समग्र स्वंयपूर्ण ग्रामविकास संकल्पनेंतर्गत या गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या गावांसाठी आवश्यक वस्तू गावातच तयार व्हाव्यात, त्याद्वारे रोजगार निर्मिती व्हावी आणि खेडी स्वावलंबी बनाव्यात अशा पद्धतीने काम होणार आहे.
शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय या चार घटकावर पहिल्यांदा फोकस राहील. प्रत्येक गावात आरोग्य मित्र असतील. आरोग्य संपन्न खेडी यासाठी ते प्रयत्नशील असतील. एखादा आजारी पडल्यास त्याच्यावर गावातच उपचार केले जातील. रोजगार निर्मिती आणि उद्यमशीलता वाढीसाठी एका गावात ३० प्रकारचे उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शेतीसंबंधी वेगवेगळे प्रयोग, शेतकऱ्यांना दर्जेदार बि बियाणे पुरविणे या बाबी करण्यात येतील असेही काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.
आयुष्यमान कार्ड योजनेचे राज्य प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी, ‘आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १०० गावांमध्ये आयुष्यमान कार्ड तयार करुन दिली जाणार आहेत.’ पत्रकार परिषदेला श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरीमठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर, कार्यकारी संचालक गुंडोपंत वड, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील, विवेक सिद, प्रसाद नेवरेकर, अभिजित चौगले उपस्थित होते.
