प्रभू श्रीराम भारतीयांचा श्वास आणि ध्यास : प्रा. नितीन बानुगडे- पाटील
कोल्हापूर : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे प्रत्येक भारतीयाचा श्वास आणि ध्यास आहेत. त्यामुळे प्रभुरामांचा आदर्श घेऊन आपले संस्कारक्षम जीवन व्यथित करावे असे आवाहन प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी केले.शिये ( ता करवीर ) येथे कार सेवकांचा सत्कार व अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठीच प्रभू श्रीरामांचा जन्म होता. हे विविध दाखले देत संपूर्ण रामायण व त्यातील प्रसंग श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभे केले. नवीनच लग्न झालेल्या प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. आणि अचानक राजा दशरथा कडून प्रभुरामांना वनवासात जाण्यासाठी सांगण्यात येते. क्षणाचाही विलंब न लावता राजपुत्राची वस्त्रे काढून वलकले नेसून प्रभु श्रीराम पत्नी सीतेसह वनवासाला जायला निघतात. ते वनवासाला जातात म्हटल्यानंतर बंधुप्रेमाने व्याकुळ झालेले लक्ष्मण सुद्धा त्यांच्याबरोबर पत्नीला सोडून वनवासात जायला निघतात. वनवासात गेल्यानंतर प्रभु श्रीरामांना भेटलेल्या हनुमंतानी भक्त कसा असतो याचा आदर्श जगाला दिला आहे. प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे खाऊन स्पृश्य – अस्पृश्य, उच्च – नीच यापेक्षा भक्ती आणि माणुसकी श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे.
रावणाने केलेले सीता मातेचे अपहरण आणि त्यानंतर घडलेले लंका दहनाचे व युद्धाचे प्रसंग बानुगडे पाटलांनी डोळ्यासमोर उभे केले होते. जीवन जगताना जीवनाच्या प्रत्येक वळणावर निस्वार्थी व सुसंस्कृत जीवन कसे जगावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री राम चरित्र आहे. त्यामुळे २२ जानेवारीला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळी घरोघरी दिवाळी साजरी करा असे बानुगडे- पाटील यांनी सांगितले.
तत्पूर्वी शिये येथून १९९०, १९९२ व २००२ साली आयोध्येत कार सेवेसाठी गेलेल्या कार सेवकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार श्रीराम सेवा समितीच्या वतीने करण्यात आला. सरपंच शीतल मगदूम यांच्या हस्ते प्रा.नितीन बानुगडे- पाटील यांचा सत्कार तर बानुगडे पाटील यांच्या हस्ते करवीर तालुका संघचालक शशिकांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक निवास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप गिरीगोसावी यांनी केले.तर आभार संयोजक शितल पाटील यांनी मानले. यावेळी शिये पंचक्रोशीतील राम भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
