रायगडावर असा होईल शिवराज्याभिषेक सोहळ्याचा लोकोत्सव
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला गेल्या वीस वर्षापासून रायगडावर सहा जून हर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावर्षी ३५० वर्षे शिवराज्याभिषेकाला पूर्ण होत आहेत. हा लोकोत्सव होत असल्याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी समाधान व्यक्त करून महोत्सव समितीचे नियोजन आणि अथक प्रयत्न, तमाम शिवभक्तांचा उत्साह आणि शासकीय यंत्रणेचे सहकार्य यामुळेच हे शक्य झाले असल्याच्या भावना पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, सुखदेव गिरी, अमर पाटील यांनी यावर्षीच्या ५ व ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हावा अशी इच्छा होती. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अवघ्या काही शिवभक्तांनी सुरू केलेला या शिवराज्याभिषेक सोहळ्याला आता देश-परदेशातून ५ लाखाच्यावर शिवभक्त येतात. दोन दिवस विविध कार्यक्रमासह छ. शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक, पालखी सोहळा संपन्न होतो. त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी दोन दिवसाच्या कार्यक्रमांची माहिती देताना सांगितले की यंदा गडावर ५ जूनला सायंकाळी ५ वाजता ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राची पारंपारिक युद्धकला कशी असते याचे दर्शन यावेळी होणार आहे. यामध्ये पट्टा, तलवार, भाला, विटा, जांबिया, कट्यार, माडू, फरी, गदका यांच्या विविध प्रकाराचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७ वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील २२ शाहीर आपली शाहिरी सादर करणार आहेत. ६ जून रोजी मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार.आणि सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपल्या आपापल्या पारंपारिक लोककलांचा या मिरवणुकीत जागर चालणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजार पेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
यावेळी सुखदेव गिरी यांनी सांगितले की शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी एकूण 36 कमिट्या केल्या असून विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या कमिट्या सध्या कार्यरत झाल्या आहेत. सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये पाच ठिकाणी अन्नछत्र, आवश्यक त्या ठिकाणी पार्किंग, मुबलक स्वच्छ व शुद्ध पाणी, आरोग्य व स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी १८०० शिवभक्त कार्यकर्ते कार्यरत आहेत. महिलांसाठी विशेष सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. दोन दिवसाच्या कार्यक्रमात येणाऱ्या शिवभक्तांची खाण्यापिण्याची,आरोग्याची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
दोन दिवस रायगडावर संपूर्ण वातावरण शिवमय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी हेमंत साळोखे फत्तेसिंह सावंत यासह कमिटी सदस्य उपस्थित होते.
