ससून हॉस्पिटलमधील दोषीना जन्माची अद्दल घडवणार : ना. हसन मुश्रीफ
कोल्हापूर : पुण्यातील ससून हॉस्पिटलसारख्या घटना व्हायच्या नसतील तर व्यवस्था खालून वरपर्यंत दुरुस्त करावी लागेल. व्यवस्थेमध्ये पारदर्शीपणा आणावा लागेल. हे ऑपरेशन नक्कीच करू. एकाही माणसाला माझे सर्टिफिकेट बदलले किंवा माझ्यावर अन्याय झालाय असं सांगायला वाव राहणार नाही अशी व्यवस्था निर्माण करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अशी सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर कडक पावले उचलावी लागतील. अशा दोषी लोकांना जीवनाची अद्दल घडवण्यासाठी कडक पावले उचलू, असेही ते म्हणाले कोल्हापुरात पत्रकारांशी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पुण्यातील ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अजय तावरे हे सध्या त्या पदावर कार्यरत नव्हते. ससूनमधील रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू झाल्यानंतर दहा एप्रिल २०२४ रोजीच त्यांना पदमुक्त केले होते. प्राध्यापक म्हणून ते काम करीत होते. रजेवर असतानाही त्यांनी तीन लाख रुपयांच्या हव्यासापोटी रक्तनमुने बदलले आहेत, हे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आ. सुनील टिंगरे यांच्या पत्रातील विनंतीनुसार त्यांना पदोन्नती दिली होती हे खरे आहे. परंतु; ससूनमधील उंदरांच्या प्रकरणानंतर त्यांना पदमुक्त केले होते. आता ते त्या पदावर कार्यरत नाहीत, ते रजेवर आहेत. त्यांनी रजेवर असताना केलेला हा प्रताप आहे. अशा घटना अतिशय चुकीच्या आहेत. न्यायालये अशा वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावर विश्वास ठेवून निकाल देत असतात. अशा घटना व्हायला लागल्या तर चुकीचा संदेश जाईल. अशा घटना घृणास्पद गोष्टी करणाऱ्यांना जीवनाची अद्दल घडलीच पाहिजे.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सिस्टीम व्यवस्थित करायची झाल्यास कडक शिस्तीचा अधिष्ठाता पाहिजे. अधिष्ठातापदी डॉ. काळे होते. त्यांनी जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली नसल्याचा अहवाल डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने दिलेला आहे. त्यांच्या निष्काळजीपणाबद्द्ल त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यानंतर बारामतीच्या अधिष्ठातांकडे कार्यभार सोपविला आहे.
अधिष्ठाता डॉ. विनायक काळे मंत्र्यांवर आरोप करून जबाबदारी टाळत आहेत काय? या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रश्नावर ते बोलत होते. ते आरोप करीत नाहीत. ललित पाटील व उंदीर प्रकरणानंतर समिती नेमून बऱ्याच गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु; पैशाच्या लालसेपोटी रजेवर असतानाही तीन लाखासाठी असा चुकीचा व खोटा अहवाल करणे ही गोष्ट चुकीची आहे. तीन लाखासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य धोक्यात आणले आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये बाहेरून हस्तक्षेप वाढू नये यासाठी काटेकोर प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
आ. रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करीत असल्याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, याबद्दल पोलीस चौकशी करतीलच. दरम्यान; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अशा गोष्टींना कधीच पाठीशी घालत नाहीत. अशा प्रकरणातील दोषींवर अतिशय कडकपणाने कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात. अंजली दमानिया यांचे आव्हानही त्यांनी स्वीकारले आहे. अजितदादा पवार यांनी एवढी मोठी घटना असल्यामुळे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांना फोन केला होता आणि दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे माध्यमांसमोरही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तुमच्या पत्रावरच डॉ. अजय तावरे यांची पदोन्नती झाली आहे, या प्रश्नावर ते म्हणाले, मंत्री म्हणजे ब्रह्मदेव नव्हे मंत्र्याचा आदेश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. संबंधित अधिकाऱ्यांनीही ते ठरवायचे आहे. चुकीचे असेल तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे.
