कोल्हापूरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा, केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी
कोल्हापूर : कोल्हापूरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह आज रात्री आगीच्या भक्षस्थानी पडले. या नाट्यगृहाला लागून असलेल्या शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाकडील बाजूला प्रथम शॉर्ट सर्किटने आग लागली आणि ती नाट्यगृहाकडे पसरली. अग्निशमन दलाच्या ८ते १० गाडयांनी आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आणता आली नाही.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरात कलासंस्कृती वाढवण्यासाठी सन १९१२ साली पॅलेस थिएटर या नावाने बांधून सुरु केलेले हे नाट्यगृह कालांतराने केशवराव भोसले नाट्यगृह झाले. १०० वर्षाहून अधिक काळ कोल्हापूरात कला संस्कृती जपत उभे असलेले आणि आतापर्यंत कितीतरी कलाकारांना घडवून मोठे केलेले हे नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडून एका रात्रीत उध्वस्त होताना पाहून कोल्हापूरकरांची हृदये पिळवटून गेली.
९ ऑगस्ट हा संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती. १३४ व्या जयंती निमित्त उद्या शुक्रवारी काही कार्यक्रमाचेही आयोजन केले होते पण जयंतीच्या पुर्वसंध्येलाच ही दुर्दैवी घटना घडली.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग इलेक्ट्रिक वायर्स, लाकडी साहित्य यामुळे पसरत गेली वातानुकुलीत यंत्रणेआग लागल्याने स्फ़ोट झाल्यानंतर आग झपाट्याने नाट्यगृहातील प्रेक्षक हॉल आणि रंगमंचापर्यंत झपाट्याने पसरली. आणि आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी तसेच वर्षानुवर्षे याठिकाणी आपली कला सादर करणाऱ्या कोल्हापूरतील कलाकारांनी धाव घेतली. जवळच असलेल्या खाऊ गल्लीतील व्यवसाय तातडीने बंद करण्यात आले. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. जिल्हाधिकारी अमोल येडके हे देखील तातडीने दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु होता.
