कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात : रात्री डॉल्बी, लाईटचा दणदणाट आणि झगमगाट
कोल्हापूर : दिवसभर डॉल्बी, लेसर लाईटला फाटा देऊन ढोल, ताशा झांज पथकासह पारंपारिक वाद्याच्या गजरात कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली. मानाच्या तुकाराम माळी मंडळाची पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि आरती करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. रात्री मात्र विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या काही गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट आणि लाईटचा झगमगट केला.
कोल्हापूर शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी रंकाळा तलावानजीकच्या इराणी खणीवर खास सोय करण्यात आली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गंगावेस, रंकाळा ते इराणी खण अशा या मिरवणूक मार्गावर दिवसभर सहभागी झालेल्या गणेश मंडळांनी कानठळ्या बसवणाऱ्या आणि हृदयाची ठोके चुकवणाऱ्या आवाजाच्या डॉल्बी सिस्टीमला तसेच प्रखर किरणाचा झोत फेकून डोळ्यांना इजा करणाऱ्या लेसर लाईटला पूर्णपणे फाटा दिला. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करताना डॉल्बी आणि लेसर लाईट चा वापर करू नये असे आवाहन केले होते त्याचे पालन दिवसभर मिरवणुकीत आलेल्या मंडळांनी केले.
ढोल, ताशे, झांजपथक, टाळ, मृदंग अशी पारंपारिक वाद्ये, लेझीम, दांडपट्टा, लाठीकाठी, असे मर्दानी खेळ, पारंपारिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि समाज प्रबोधन पर सजीव आणि तांत्रिक देखावे, वेशभूषा तसेच सादरीकरणावर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी विशेष भर दिल्याचे दिसून आले.
सायंकाळी सहानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांनी मात्र अनेक मोठमोठ्या डॉल्बी सिस्टीम आणि प्रखर लाईटचा वापर केल्याचे दिसून आले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने इराणी खणीवर मूर्ती विसर्जनासाठी खास जेसीबी, क्रेन, तराफे अशा अद्यावत यंत्रसामुग्रीची सोय करण्यात आली. याबरोबरच अग्निशमन दलाचे पथक, लाइफ जॅकेट, दोरखंड, होड्या यासह आवश्यक साहित्यसह जवानांचे पथक तैनात करण्यात आले. मिरवणूक मार्गावर आमदार राजेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गट, माजी महापौर सत्यजित उर्फ नाना कदम शिवसेना शिंदे गट, सराफ संघ, कोल्हापूर महानगरपालिका, हिंदू एकता आंदोलन आदी पक्ष आणि सामाजिक संघटनांच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले. या ठिकाणी मंडळाच्या अध्यक्षांचा फेटा, श्रीफळ, पान, सुपारी देऊन सत्कार करण्यात आला. मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या आबाल वृद्धांनी गर्दी केली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अतिरिक्त अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होमगार्डचा ताफा तैनात करण्यात आला.
