डी मार्ट मध्ये बिस्कीटानां बुरशी : काही मुलींना विषबाधा
कोल्हापूर : येथील डी मार्ट मधून खरेदी केलेली कराची कंपनीची बिस्किटे खाऊन छोट्या मुलींना अन्नातून विषबाधा झाली. या बिस्कीटांची तपासणी केली असता त्यावर बुरशी आल्याचे दिसून आले. यामुळे संतप्त मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट डी मार्ट धडक मारून तेथील व्यवस्थापनाला मनसे स्टाईल जाब विचारला. विष बाधित मुलींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांना डी मार्टमध्ये विक्रीला ठेवलेल्या काजू कतलीलाही बुरशी आल्याचे आढलळे. कराची कंपनीची बिस्किटे व काजू कतलीला बुरशी झाली असताना डी मार्टमधून त्याची विक्री केली जात होती. बुरशी चढलेली बिस्किटे व काजू कतली मनसे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी स्टोअर मॅनेजर अजिंक्य थोरात याला दाखवून मनसे स्टाईलने धडा शिकवला.
अन्न औषध प्रशासन आयुक्त तुषार शिंगाडे व निरीक्षक गणेश कदम यांना डी मार्ट मध्ये बोलावून घेऊन बुरशी चढलेली सर्व बिस्किटे, काजुकतली, मशरूम व अन्य बुरशीजन्य पदार्थ सील करावयास लावून त्याचा पंचनामा करून स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. तसेच अन्न औषध प्रशासनाकडून बुरशीजन्य पदार्थ सील करण्यात आले. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर डी मार्टवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
डी मार्टमध्ये विक्री केलेल्या मालाच्या वजनातही घट येत असल्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ताराबाई पार्क डी मार्टमधून डाळ खरेदी करून त्यामधील वजन काटामारीचा व्हिडीओ करताना डी मार्ट कर्मचाऱ्याकडून धक्कादायक व वाईट अनुभव आला आहे.
याबाबत मंगळवार २ जानेवारीला वजन, मापे नियंत्रकाला घेराव घालणार असल्याची माहिती शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी दिली.
नवीन वर्षात ‘बॅन डी मार्ट’ अभियान राबवणार असून कोल्हापूरच्या जनतेने डी मार्ट मधून कोणतेही वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी केले.
या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजू पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, यतीन हुरणे, उत्तम वंदूरे, अमित साळुंखे, राहुल पाटील, संतोष चौगुले रणजीत वरेकर, अरविंद कांबळे इत्यादी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
