हुडहुडी ! राज्यात वर्षअखेरीस वाढणार थंडीचा कडाका…
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे देशात गारठा वाढला आहे. वर्षाअखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे. काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहेत. परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमनात मोठी घट पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे, पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार होत आहे. राज्यात वर्षाअखेरपर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे.
