शिरोलीतील ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा’चे भिडे गुरुजींच्या हस्ते लोकार्पण
शिरोली : येथील शिरोली फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ या स्वागत कमानीचा उद्घाटन समारंभ शनिवार दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या स्वागत कमानीचे उद्घाटन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीमुळे संपूर्ण देशात व परदेशात ओळखले जाणारे गाव म्हणून पुलाची शिरोलीची ओळख आहे. गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सर्व नियमांचे पालन करून ही स्वागत कमान उभी करण्याचा निर्णय तत्कालीन सरपंच शशिकांत खवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झाला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे जिल्हा कार्यवाह
सुरेश यादव, तसेच अर्जुन चौगुले, नितीन चव्हाण यांच्यासह गावातील धारकऱ्यांनी ही कमान उभारणी करण्याच्या आराखडा, व्यवस्थापनासह श्रमदानाची जबाबदारी घेऊन कमान उभारणीचे काम पूर्ण केले.
गावाच्या वैभवात भर पडणाऱ्या या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा गावातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे व तरुण मंडळांचे कार्यकर्ते आदींच्या साक्षीने पार पडणार आहे, अशी माहिती सुरेश यादव, अर्जुन चौगुले, नितीन चव्हाण यांनी दिली.
माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, ह.भ.प. विठ्ठल पाटील, दिलीपराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, योगेश चव्हाण यांच्यासह गावातील विविध सहकारी संस्था व सामाजिक संस्था तसेच व्यक्तिगत पातळीवर झालेल्या उत्स्फूर्त सहकार्याने आकर्षक आणि भव्य- दिव्य स्वागत कमान उभारली गेली आहे. शिरोलीची शान, शिरोलीचा मान, शिरोलीचा सन्मान, शिरोलीचा स्वाभिमान म्हणजेच ‘छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमान’ अशी टॅग लाईन तयार करून शिरोलीसह संपूर्ण पंचक्रोशीतील तमाम लोकांना उद्घाटन समारंभ निमंत्रित केले आहे. याबरोबरच कमान मार्गावर आकर्षक रांगोळी, सजावट, सनई चौघडे, विद्युत रोषणाई, आतिषबाजी करून गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून कमानीचे लोकार्पण केल्यानंतर भिडे गुरुजी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
