शेती पाणीपट्टी दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन : आ. सतेज पाटील, राजू शेट्टी
कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्था व शेतकऱ्यांची पाणीपट्टी दरवाढ मागे घ्यावी. अन्य मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. ६ जून रोजी महाराष्ट्रातील युती सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.तर सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. राज्य इरिगेशन फेडरेशन व पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था व सभासद शेतकऱ्यांच्या वतीने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत दर्ग्यासमोरकेलेल्या आंदोलनात ते बोलत होते.
कृषीपंपाची शासकीय दहापट पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी. सवलतीच्या दराने पाणीपुरवठा करावा. आणि पाणीपट्टी भरल्यानंतर शेतकऱ्यांची राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी. यासह अन्य मागण्यासाठी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. भारत पाटणकर, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार राजू शेट्टी, विक्रांत पाटील यांनी केले.
यावेळी पुढे बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका घेत असून १००% वीज बिल व पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवाढ करून आर्थिक संकटात ढकलत आहे. तर केवळ १९ टक्के पाणीपट्टी भरणाऱ्यां धनदांडग्यांना एक प्रकारे मदतच करीत असल्याचा आरोप त्यांनी करून ते पुढे म्हणाले ज्यापद्धतीने सरकारने शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालून रस्ते बांधणीच्या ठेकेदारांसाठी काम केलं आहे त्याच पद्धतीने वॉटर मीटर बसवण्याच्या नावाखाली वॉटर मीटरच्या ठेकेदारांना मोठे करण्याचा घाट या सरकार कडून घातला जात आहे.
या दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या नेत्यांची भेट देऊन सरकारकडून ६ जून रोजीच्या बैठकीचे लेखी पत्र दिले. आता यासंदर्भात ६ तारखेला बैठक होणार असल्याने रास्ता रोको आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात येऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचे निश्चित केले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. एकीकडे सरकार शेतक-यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय लादत असून दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ.आर.पी मध्येही तोडमोड करून तुकड्यामध्ये शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एकरक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आ. सतेज पाटील, आ. अरूण लाड, मा. आ. संजयबाबा घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील- किणीकर, राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, बाजार समिती सभापती भारत पाटील, करवीर पंचायतीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांचेसह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
