November 2, 2025

कोल्हापूर, सांगलीतील 29 वीज उपकेंद्रे झाली सुसज्ज

0
कोल्हापूर : महावितरणच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 29 उपकेंद्रानी ‘एक दिवस-एक उपकेंद्र’ या देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता  मोहिमेतून कात टाकली आहे. ग्राहकसेवेसाठी ही उपकेंद्रे अधिक सुसज्ज झाली आहेत.
     ग्राहकांना अखंडित, विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी विद्युत यंत्रणेची नियमित देखभाल-दुरूस्ती  करणे आवश्यक असते. विद्युत प्रणालीत वितरण उपकेंद्र हे एक महत्वाचे अंग आहे. विद्युत दाब सनियंत्रण, वीजमापन, सुरक्षा याकरिता उपकेंद्रांची आवश्यकता असते.
    कोल्हापूर जिल्ह्यातील 33/11 केव्ही कुरुंदवाड, चोकाक, शिरढोण, हातकणंगले (जयसिंगपूर विभाग), आजरा (गडहिंग्लज विभाग), शेळोली, कडगाव, गारगोटी, दारवाड, कापशी, कुरणी, (कोल्हापूर ग्रामीण विभाग 2), सातवे, कांचनवाडी, वडकशिवाले, बालिंगा (कोल्हापूर ग्रामीण विभाग 1) तर सांगली जिल्ह्यातील 33/11 केव्ही नागराळे, पलूस, गार्डी (विटा विभाग), शिराळा, इस्लामपूर-2, इस्लामपूर-गणेशनगर, औद्योगिक वसाहत इस्लामपूर, बहे, येडेमच्छिंद्र, रेठरे हरणाक्ष, नवे खेड (इस्लामपूर विभाग), बोरगाव, करोली टी (कवठेमहांकाळ विभाग), मणेराजुरी (सांगली ग्रामीण विभाग) या ठिकाणी ‘एक दिवस-एक उपकेंद्र’ मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतून उपकेंद्र परिसरातील स्वच्छता, ब्रेकर्स, सीटी व पीटीची दुरूस्ती, डिओ तपासणी, पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑईल पातळी तपासणी, आयसोलेटरचे ऑईलिंग व ग्रिसिंग, बॅटरी देखभाल, ११ केव्ही  फिडरचे जंप बदलणे, उपकेंद्र आर्थिंगची कामे इ. देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात आली. उर्वरीत उपकेंद्रात ही मोहिम प्रगतीपथावर आहे.
    मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता अंकुर कावळे (कोल्हापूर), अधीक्षक अभियंता  धर्मराज पेठकर (सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, दिपक पाटील, विजयकुमार आडके, वैभव गोंदिल, विनायक इदाते, चंद्रकांत डामसे,  बाळासाहेब हळनोर, सौरभ माळी यांच्या पर्यवेक्षणाखाली सर्व संबंधित उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, जनमित्र, यंत्रचालक यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page