का झाली मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी?
कोल्हापूर : गेली १९ वर्षे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले मुरलीधर जाधव यांना तडकाफडकी पाय उतार व्हावे लागले. मातोश्री वरून थेट नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्तीचे आदेश निघाले. यामुळे जाधव यांची उचलबांगडी झाल्याचे स्पष्ट झाले आता नवे जिल्हाप्रमुख म्हणून हातकणंगले, शाहूवाडीसाठी संजय चौगुले तर शिरोळ, इचलकरंजीसाठी वैभव उगळे यांना ही जबाबदारी दिली आहे.
मुरलीधर जाधव १९ वर्षापासून शिवसेनेच्या
जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आक्रमक आंदोलने केली. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठाही दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. यातून त्यांना गोकुळ दूध संघात शासन नियुक्त संचालक म्हणून संधी देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले तत्कालीन मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरले होते.
एका बाजूला पक्ष आणि ठाकरे यांच्यावरील निष्ठा सिद्ध करताना मुरलीधर जाधव यांनी विधानसभेच्या गेल्या दहा वर्षातील दोन निवडणुकीत त्यांच्या कार्यक्षेत्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र अपेक्षित सहकार्य केले नाही. उलट दुसऱ्याच उमेदवारांशी हात मिळवणी केली.
हे जाधव यांचे वागणे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आणि सपंर्क मंत्री दिवाकर रावते यांना माहित नव्हते असे नाही. पण त्यांनीही जाधव यांची पाठराखणच केली. शिवसेना भवनातून कोल्हापूरात निरीक्षणासाठी वारंवार येणारे अनिल देसाई यांच्याही ही बाब निदर्शनास आली होती. यातूनच शिवसेनेचे आमदारकीचे उमेदवार पराभूत झाले. याबाबतच्या तक्रारी खुद्द या उमेदवारांनीच उद्धव ठाकरे यांचेकडे केल्या. इतकेच नाही तर ते जिल्हाप्रमुख असतील तर आम्हाला विधानसभेची पुन्हा पराभूत होण्यासाठी उमेदवारीच नको अशी टोकाची भूमिका शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील यांनी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांचेकडे मांडली होती. फुटी मुळे त्रस्त असलेल्या शिवसेनेला तीन माजी आमदार नाराज करणे परवडणारे नव्हते.
असे असूनही शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने शिंदे गटाच्या शिवसेनेत गेल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख म्हणून मुरलीधर जाधव यांनी उमेदवारीचा दावा केला. यासाठी त्यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन केले. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपण संघटनेच्यावतीने या मतदारसंघात लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जाधव यांनी राजू शेट्टी यांनाही टीकेचे लक्ष्य केले.
एका बाजूला महाविकास आघाडीचे नेते राजू शेट्टी यांना आघाडीत येण्यासाठी गळ घालत असताना मुरलीधर जाधव मात्र शेट्टींना वारंवार डिवचत राहिले. निवडून येण्याची क्षमतेचा उमेदवार शोधणे आणि भाजप, शिंदे, पवार गटाच्या विरोधात व्युहरचना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुरलीधर जाधव यांच्या हा आक्रसताळेपणा अडचणीचा ठरू लागला होता.
जाधव यांच्यावरील तक्रारीमुळे उद्धव ठाकरे हे देखील मुरलीधर जाधव यांना हटवण्याबाबत विचार करीत होते. त्यातच ठाकरे-शेट्टी भेटीवरून मुरलीधर जाधव यांनी पुन्हा शेट्टींवर टोकाची टीका केली. आणि हीच टीका मुरलीधर जाधव यांना तडकाफडकी पदावरून हाकलण्यासाठी कारणीभूत ठरली.
