November 2, 2025

काय आहे हातकणंगलेत जनसुराज्यचे अशोकराव माने यांची स्थिति?

0
FB_IMG_1730624209707

शिरोली : विधानसभेच्या निवडणूकीसाठी हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून जनसुराज्य पक्षाचे उमेदवार असलेले अशोकराव माने यांना व्यक्तीगत संपर्क आणि प्रचार यंत्रणेपेक्षा लोकसभेच्या निवडणूकीत वापरलेली तालुक्यातील नेत्यांची एकी आणि शेवटच्या टप्प्यातील वारेमाप पैशाचा वापर हीच रणनीती कामी येणार आहे.
अशोकराव माने यानी गेल्यावेळीही जनसुराज्य पक्षातून निवडणूक लढवली तेव्हा शिवसेना भाजप युती होती. शिवसेनेचे. डॉ. सुजित मिणचेकर उमेदवार होते. पण शिवसेनेतील आणि भाजपमधीलही एका एका गटाने मानेनां अंतर्गत मदत केली होती. तरीही माने यांना तिसऱ्या क्रमांकांची ४५ हजारच्या आसपास मते मिळाली होती. विजयी झालेल्या काँग्रेसच्या राजूबाबा आवळे आणि डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात केवळ सात हजाराचा फरक होता. अशोकराव मानेनां विजयी आवळेंपेक्षा निम्याहून कमी मते होती.
अशोकराव माने ही निवडणूक पुन्हा लढवण्यासाठी गेले ५ वर्षे तयारी करीत होते. पण आपण यावेळी भाजप मधून लढणार असे सांगत होते. प्रत्यक्षात आ. विनय कोरे यांनी त्यांना जनसुराज्यमधूनच रिंगणात उतरवले. अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारीच्या चर्चेवेळी तीन नंबरची मते घेणाऱ्याला उमेदवारी देताना मधला मतांचा फरक कसा भरून काढणार असा मुद्दा उपस्थित करून या ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या सुचना केल्या होत्या. डॉ. मिणचेकर यांचा विचार करा असेही सुचवले होते. अर्थातच त्याला आ. कोरे आणि खा. धैर्यशील माने यानी असहमती दर्शवली. आणि अशोकराव माने हेच उमेदवार ठरले.
हातकणंगले मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार कमळ या चिन्हावर असावा अशी निष्ठावंत जुन्या भाजपच्या एका प्रभावी गटाची मागणी होती. खऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षात न्याय मिळाला नाही. अशा भावना या गटाच्या आहेत. त्यातून अशोकराव माने यांच्या उमेदवारीला या गटाने दोनवेळा उघड मेळावे घेऊन विरोध केला. त्यानंतरही हा गट प्रचारापासून अलिप्तच राहीला. दुसऱ्या बाजूला खा. धैर्यशील माने यांचाही गट अंतर्गत काँग्रेसच्या राजूबाबा आवळेंकडे वळला असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
लोकसभेला महायुतीच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे खा. धैर्यशील माने यानां निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे एकवटलेले तालुक्यातील महाडिक, कोरे, आवाडे, यड्रावकर हे नेते आणि त्यांचा गट या नेत्यांच्याच मतदासंघात व्यस्त आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा कार्यरत ठेवण्याची जबाबदारी अशोकराव माने आणि त्यांच्या समर्थकांवर आहे, माने हे मतदारसंघाबाहेरील म्हणजे शिरोळ तालुक्यातील आहेत. त्यामुळे प्रचार यंत्रणा राबवण्यावर मर्यादा येत आहे. भाजपच्या रणनीतीनुसार मतदान केंद्रावरील नियोजन व्यवस्थित लागले आहे. पण प्रचार यंत्रणेतील विस्कळीतपणा अजूनही दिसून येत आहे.
‘डॅमेज कंट्रोल’चे काम जनसुराज्यचे प्रमुख म्हणून स्वतः विनय कोरे यानांच करावे लागत आहे. त्यातून त्यानी भाजप निष्ठावंतांची वारणेवर बैठक घेउन नाराजी दूर केली आहे. त्याचा कृतीतून परिणाम किती होतो ते यापुढे मतदानाच्या दिवसापर्यंत दिसून येईल. पण विजयापर्यंत पोहचण्यासाठी माने याना तालुक्यातील महायुतीचे नेते आणि अर्थनियोजनच कामी येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page