December 27, 2025

आजरा तालुक्यात वाड्यावस्त्यांवर क्रेझ राजेंचीच!

0
IMG-20240423-WA0393

आजरा : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आता वेगवान टप्प्यावर आली आहे. आजरा तालुक्यातही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उमेदवार शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती व संयोगितराजे छत्रपती यांनी आजरा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील मतदारांशी थेट संपर्क साधण्याची मोहिम जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत नेली आहे. त्यांच्या या धडाकेबाज प्रचार मोहिमेमुळे ग्रामीण भागामध्ये शाहू छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांची क्रेझ दिसू लागली आहे.
मूळात राजर्षी शाहू महाराजांचे वारस थेट आपल्याशी संपर्क साधत आहेत व मतदानासाठी भावनिक साद घालत आहेत ही कल्पनाच मतदारांना सुखद अनुभव देऊन जात आहे. गेले दोन दिवस मोठ्या प्रचार सभा टाळत थेट ग्रामीण भागात घराघरात पोहचून आपले विचार मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती व स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. हा महाविकास आघाडीचा प्रचाराचा फॉर्मुला कमालीचा यशस्वी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.            ठीक ठिकाणी संभाजीराजे छत्रपती, शाहू छत्रपती यांचे उत्साही स्वागत होताना दिसत आहे. शाहू छत्रपती यांची उमेदवारी लवकरच व वेळेत जाहीर झाल्याने महाविकास आघाडीला प्रचारासाठी मोठा कालावधी लाभला. या संधीचे सोने करीत महाविकास आघाडीने तालुक्यातील गावागावांसह दुर्गम भागातही पोहोचण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यात नियोजनाचा भाग महत्त्वाचा फॅक्टर ठरत आहे. संभाजीराजे छत्रपतींचे आगमन होताच ग्रामीण भागातील आबाल वृद्धांसह ज्येष्ठ मंडळीही राजर्षी शाहूंचे वारस आपल्या दारी आले आहेत, या कुतूहलापोटी गर्दी करत असून त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्यासही झुंबड उडत आहे. काही वयोवृद्ध मंडळी तर राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी संभाजीराजेंशी शेअर करताना दिसत आहेत. एकंदर मतदारांमध्ये शाहू छत्रपती व संभाजीराजे छत्रपती या राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांची क्रेझ निश्चितच दिसू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page