November 2, 2025

आपापले मतदारसंघ घट्ट करा, महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ यांचे आवाहन

0
IMG-20240330-WA0198

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये शिवसेना,-शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचार नियोजनासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यानिमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे या प्रमुखांसह सर्वांनी एकीचेही प्रदर्शन केले.
यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय. विद्यार्थी, नवमतदार, व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचेच, ही शपथ घ्या.
प्रास्ताविकपर भाषणात उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम. ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल.
माजी आ. के. पी. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया. कामाची पोहोचपावती मोठ्या मताधिक्यातून निश्चितच मिळेल.
मेळाव्यात महाडिक घराण्यातील आणि गटातील प्रमुख व्यक्ती आणि नेते यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली याबाबत स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच खुलासा केला. खासदार धनंजय महाडिक हे दिल्लीला गेल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकले नाहीत. माजी आमदार अमल महाडिक हे सत्यजित कदम यांच्या घरातील विवाह सोहळ्यात आहेत. चंदगडचे भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील हे मुंबईत असल्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत, तरी कोणीही गैरसमज करून घेऊ नये
भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, कालचा विषय वेगळा होता. जे बोललो ते रोखठोक बोललो. परंतु मनात काहीही नाही. भाजपच्या दहा हजाराहून अधिक पदाधिकाऱ्यांसह अहोरात्र काम करू, एक दिवसही विश्रांती घेणार नाही.
आमदार राजेश पाटील म्हणाले, या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ कृष्णाच्या भूमिकेत आहेत तर खासदार धनंजय महाडिक हे अर्जुनाच्या भूमिकेत आहेत. विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्याची उत्सुकता आहे.
आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खासदारकीच्या दहा निवडणुकांचा अनुभव पाठीशी आहे. तगड्या संघटनाच्या जोरावर ही निवडणूकही जिंकू.
माजी आ. चंद्रदीप नरके म्हणाले, सर्वच मित्रपक्षांनी समन्वयाने काम करूया. द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडू.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेले अफाट काम घेऊन मतदारांपर्यंत जाऊया. विरोधी बाजूला आरोप प्रत्यारोपाची संधी न देण्यासाठी त्यांच्यावर टीका न करण्याचे धोरण घेऊया. मोदींचे “चारशे पार” चे उद्दिष्ट या निवडणुकीत निश्चितच यशस्वी होईल,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणाने पार पाडूया.
या मेळाव्यात जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनीही एकत्रित काम करून प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील- कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप उर्फ भैया माने, ॲड. नीता मगदूम, नाथाजी पाटील, सतीश पाटील, कृष्णा चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत राजेखान जमादार यांनी केले. आभार नाथाजी पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page