शाहू, फुले आंबेडकरांचा प्रभाव, जनतेचा आग्रह म्हणून मी मैदानात : श्रीमंत शाहू छत्रपती
कोल्हापूर : शाहू, फुले आंबेडकर यांचा प्रभाव माझ्यावर आहे. तसेच कोल्हापूरच्या जनतेच्या प्रचंड आग्रहामुळेच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो असल्याची स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदार संघाचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना मांडली.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यावेळी म्हणाले आज महाराष्ट्रात परिस्थिती पहिली तर गेल्या 60 वर्षात जी नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे, याचं कारण पक्षांतर बंदी कायदा फेल झाला आहे. समाजाला जी दिशा पाहिजे होती ती सुधारायला हवी होती,जी सुधारेल असे वाटत नाही. देश एकाधिकारशाहीकडे वळत आहे, लोकशाही टिकली पाहिजे म्हणूनच शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतेचा विचार पुढे नेण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे.
राजकारणात मी प्रत्यक्षात नव्हतो, आता समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन कोल्हापूरच्या विकासाला चेहरा आणि गती देण्यासाठी मैदानात उतरलो आहे. जनतेने प्रचंड आग्रह केल्यामुळेच लोकसभेची उमेदवारी स्वीकारली आहे. शाहू, फुले आंबेडकर यांचा माझ्यावर प्रभाव आहे. यासाठीच सर्वांना महाराजांची गरज आहे असे वाटलं असावं म्हणून मला उमेदवारीचा आग्रह करण्यात आला. कोल्हापूर कोकण रेल्वे, विमानतळ याबरोबरच अनेक प्रश्नावर काम करणार असून कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव मिळायला हवं ते का मागे पडत आहे समजत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.कोल्हापूरात मान गादीला, मत गादीलाच मिळणार आणि कोल्हापूर महाराष्ट्राला नेतृत्व देणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
