अपहार प्रकरणी कारवाई न झाल्याने शिवसेनेचा महापालिकेला घेराव
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी संगनमताने ८५ लाखाचा अपहार केल्याचे उघड होऊनही आयुक्तानी त्यांच्यावर कारवाई केली नाही. या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने महापालीकेला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालून निषेध करण्यात आला. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वात महापालिकेला घेराव आंदोलन करण्यात आले.
यावेळी महापालिकेच्या एकूणच कारभारावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जोरदार टीका केली.
ते म्हणाले की बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात कोल्हापूर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जाहीर टक्केवारीचा आरोप झाल्याने शहरवासियांमध्ये संतापाची लाट असताना मनपा प्रशासनाकडून अजून कोणतीच थेट कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेची ज्या पद्धतीने लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत ते पाहता तातडीने हालचाल करून संबंधितांना धडा शिकवण्याची गरज होती. मात्र, अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच शहर अभियंता पद हा मनपात चेष्टा आणि भ्रष्ट कारभाराचा विषय बनले आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
मनपामधील अधिकारी वर्ग भ्रष्ट झाला असून यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नको आहेत. 85 लाखांचा घोटाळा हा कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं केल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामधील फलक सुद्धा लक्ष वेधून घेत होते.यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. विविध मागण्यांचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले.
