मंडलिकांना खडे बोल सुनावत भाजपने दिला पाठिंबा
कोल्हापूर : महायुतीतून कोल्हापूर मतदारसंघात खासदार संजय मंडलिक यांना शिवसेना, शिंदे गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आज भाजपच्या कार्यालयात जाऊन नेते व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या मेळाव्यात भाजपचे नेते महेश जाधव यांनी संजय मंडलिक यांना प्रथम खडे बोल सुनावले आणि त्यानंतरच त्यांचे स्वागत करून पाठिंबा व्यक्त केला.
महायुती आणि देशातील एनडीए आघाडीकडून कोल्हापुरात भाजपला उमेदवारी मिळावी अशी जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांनी इच्छा होती. पण अखेर शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. आणि त्यांनी आज प्रथम कोल्हापुरातील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, तसेच समरजीत घाटगे उपस्थित होते.
खा. संजय मंडलिक यांना प्रथम भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी त्यांना खडे बोल सुनावत कार्यकर्त्यांच्या भावनांच व्यक्त केल्या. ‘आम्ही तुम्हाला रक्ताचे पाणी करून निवडून आणले. पण तुम्ही गेल्या पाच वर्षात भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याची कामे केली नाहीत. मते द्यायला आम्ही आणि कामे मात्र काँग्रेसवाल्यांची केली. त्यापुढे असे चालणार नाही’ असा स्पष्ट इशारा दिला. त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांपैकी एक तरी मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी आम्ही गेली दोन वर्षे प्रयत्न करीत आहोत. पण त्याला यश आले नाही आता यापुढे तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांचे गुणगान गाणे बंद केले पाहिजे. याबरोबरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपली जुनी मैत्री विसरली पाहिजे. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनीच त्यांना सांगावे असे महेश जाधव यांनी सांगताना जिल्हा बँक, गोकुळ, महापालिका यासाठी त्यांच्यासोबत आणि आम्हाला विरोध हे चालणार नाही. भाजपाची सत्ता असताना जिल्ह्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोन्याचे दिवस आले पाहिजे अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आपण भाजपकडे गेलो त्यामुळे हे अंतर पडले असल्याचे कबूल करून यापुढे आपण योग्य ती दक्षता घेऊ आणि कायम पणे भाजपच्या संपर्कात राहून कामे केली जातील असेही आश्वासन दिले.
