संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावलेली खासदारांची बैठक संपन्न
नवी दिल्ली : मराठा आरक्षणा बाबत संसदेत राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी आवाज उठवावा यासाठी माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये बोलावलेली बैठक आज पार पडली. या बैठकीला राज्यातील २० हून अधिक खासदारांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे या बैठकीला उदयनराजे भोसले यांनी देखील उपस्थित राहत चर्चेत सहभाग घेतला होता. उपस्थित राहू न शकलेल्या काही खासदारांनी फोनवरून संपर्क साधून आपला पाठिंबा जाहीर करून संसदेत आरक्षणाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीबाबत पत्रकारांना माहिती देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली मात्र मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल ही चर्चा तेथे झाली नाही. आणि यामुळे आजच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल ही चर्चा करण्यात आली. आरक्षण देण्याची भूमिका ही सर्वांचीच आहे, मात्र आरक्षण मिळाल्यानंतर ते टिकणार कसं यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना होणे आवश्यक आहे. जातीय जनगणना झाली तर मराठा समाज असो किंवा ओबीसी सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळेल. या संदर्भात सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र देणार आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले,न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजास शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा समज झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्याच्या निकालानुसार एखाद्या राज्यात एखाद्या समाजाला आरक्षण देत असताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही. जर ही मर्यादा ओलांडायची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थितीत असल्याचे सिद्ध करावे लागते. परंतु अपवादात्मक परिस्थितीचे निकष हे १९९२ च्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही. त्यामुळे आजच्या परिस्थिती नुसार अपवादात्मक परिस्थितीचे निकष हे ठरविण्यात यावेत, असे ठराव या बैठकीत करण्यात आले.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले की गेल्या 40 वर्षांपासून मराठा समाजाची मागणी असून राज्यकर्ते निर्णय घेत नाहीत फक्त सोयीची भूमिका घेतात.
या बैठकीला महाराष्ट्रातील धैर्यशील माने, (शिंदे गट) हातकणंगले, श्रीकांत शिंदे, (शिंदे गट) कल्याण डोंबिवली, धनंजय महाडीक, भाजप (राज्यसभा), संजय मंडलिक, (शिंदे गट) , कोल्हापूर) हेमंत गोडसे, (शिंदे गट) नाशिक
ओमराजे निंबाळकर, शिवसेना (ठाकरे गट) धाराशिव, उदयनराजे भोसले, राज्यसभा (भाजप) राहुल शेवाळे, दक्षिण मध्य मुंबई ( शिंदे गट) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, दिंडोरी. (भाजप) प्रतापराव जाधव, (शिंदे गट) बुलढाणा. रावसाहेब दानवे ,(भाजप) जालना.सुधाकर शृंगारे, (भाजप) लातूर. गजानन कीर्तीकर, (शिंदे गट) – उत्तर पश्चिम भावना गवळी, (शिंदे गट)- यवतमाळ वाशिम, रणजित निंबाळकर, भाजप – माढा, कपिल पाटील, भाजप – भिवंडी प्रतापराव चिखलीकर, (भाजप) नांदेड, प्रफुल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यसभा कृपाल तुमाने, (शिंदे गट), उन्मेष पाटील, भाजप हे उपस्थित होते.
