‘शब्द दिलाय म्हणून मला पाठिंबा द्या’ : राजू शेट्टींची पुन्हा आळवणी
                कोल्हापूर : ‘तुम्ही मला शब्द दिलाय म्हणून मलाच पाठिंबा द्या’ असा सूर पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आळवला आहे. यासाठी एक पाऊल मागे येण्याची म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांकडून समजते.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेने मशाल चिन्हावरच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. तर दुसऱ्या बाजूला वंचित आघाडीने जाहीर केलेले उमेदवार डी. सी. पाटील हे जैन समाजाचे असल्याने राजू शेट्टी यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच आता राजू शेट्टी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून पाठिंब्याचा शब्द दिल्याची आठवण करून देत आहेत. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांपासून जिल्हा पातळीपर्यंत सर्वच नेत्यांनी पहिली पसंती राजू शेट्टी यांनाच दिली होती. पण त्यांची ‘एकला चलो रे’ ची भूमिका सर्वांनाच खटकत होती. त्यांनी फक्त महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सामील व्हावे असा सर्वांचा आग्रह आहे. महायुतीतून शिंदे गटाचे धैर्यशील मानेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचार सुरू केला आहे. यापूर्वीच विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क दौरा पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. नाइलाजाने उद्धव ठाकरेंनीच आता मशाल चिन्हावरच शिवसेनेचा उमेदवार देण्याचे  संकेत दिले. यासाठी  चर्चेत असलेले माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर आणि सत्यजित पाटील यांची नावे ही पुढे आली आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी निरोप दिल्यानंतर डॉ.  मिणचेकर मुंबईत दोन दिवस थांबून होते. दरम्यान उद्धव ठाकरे, शरद पवार दिल्लीत गेले.
हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींच्याही प्रचाराला फारसा वेग आलेला नाही. वंचित आघाडी कडून दिलेले उमेदवार डी. सी. पाटील जैन समाजाचे आहेत. ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांनी मिळवलेल्या मताचा फटका प्रामुख्याने राजू शेट्टी यांनाच बसणार आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याशी फोनवरून  प्राथमिक चर्चा करून घटक पक्ष म्हणून सामील होण्याबाबत सकारात्मकता दर्शवले असल्याचे समजते. प्रत्यक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी राजू शेट्टी यांची चर्चा झाली तर काही ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या राजू शेट्टी मुंबईला जाणार असल्याचेही समजते. यातून राजू शेट्टी महाविकास आघाडीचे उमेदवार होऊ शकतात अन्यथा मशाल चिन्हावर डॉ. सुजित मिणचेकर किंवा सत्यजीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
