पन्हाळगडावर छ. शिवरायांच्या स्मारकासह पुतळा उभारणार : पालकमंत्री मुश्रीफ
पन्हाळा : किल्ले पन्हाळा गडावर छञपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह पुर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला पन्हाळा गडावरुन केली. शिवाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीसाठी प्रेरणादायी व्हावा यासाठीच हा अट्टाहास असल्याचेही, मुश्रीफ यांनी सांगितले.
पन्हाळा गडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वराज सप्ताहातंर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पालकमंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते.
पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, छञपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या दोन्हीही लोकराजांनी प्रसंगी आपल्या खजिन्यातून जनतेचे हित जोपासले. त्यामुळे शिवाजी महाराज यांची ३५० वर्षांनंतर तर शाहू महाराज यांची १५० वर्षांनंतरही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो आहोत. त्यांचा जयजयकार करतो आहोत. हेच स्वराज्य यावे, अशीच जनतेची मनोमनी अपेक्षा असाव्यात.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या राजनिती, युद्धनीती, स्वभावगुणासह अनेक ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला. ईतर वक्त्यांनीही आपल्या भाषणातून छञपती शिवाजी महाराज, वीर शिवा काशिद, नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर यांच्याही इतिहासाला उजाळा दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलले होते.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसूर्लेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितलताई फराकटे, मधुकर जांभळे, पन्हाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष धुमाळ, गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगुले, अमरसिंह माने – पाटील, बाबासाहेब देशमुख, आसिफ फरास, संभाजीराव पाटील, अमित गाताडे, आसिफ मोकाशी, शिरीष देसाई, शिवाजी देसाई, प्रकाश पाटील – टाकवडेकर आदीप्रमुख उपस्थित होते.
