मंत्रीपदाची आस; बड्या नेत्यांचा भ्रमनिरास
कोल्हापूर : मी पक्षाचा जेष्ठ नेता, प्रवक्ता, बीनीचा शिलेदार म्हणून माझे मंत्रीपद अढळ! असा ठाम विश्वास असलेल्या महायुतीमधील तीनही घटक पक्षातील दिग्गजांच्या मंत्रीमंडळ विस्तारात अचानक धडाधड दांड्या उडाल्या. याच नेत्यांनी निवडणूकीत आणि त्यापूर्वीही विरोधकांना कर्तव्य, पक्ष आणि नेत्यांवरील निष्ठा दाखवण्यासाठी अंगावर घेतले, याच नेत्यांना आता बसलेले हे मोठे धक्के पचवणे चांगलेच जड जात आहे. यावर काय बोलायचे? काय आणि कशा प्रतिक्रिया द्यायच्या? हेच या नेत्यांना कळेनासे झाले आहे. अनेक वर्षे मंत्रीपदावर राहून पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेऊन आपआपल्या जिल्हयात आपल्या कार्यकत्यांच्या स्वागताला सामोरे जाण्याची तयारी करून बसलेले हे नेते आता जनते समोर जायचे कसे या गर्तेत सापडले आहेत.
काहीजण उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. काही रुसून गेले. काहीनी मंत्र्याच्या शपथविधी कार्यक्रमाला दांडी मारली तर काहीनी नागपूरमधील अधिवेशनाला हजर न रहाता निघून गेले. कोणी सावध प्रतिक्रिया दिल्या. कोणी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगताना चेहरा आणि देहबोलीतून भावना व्यक्त केल्या. कोणाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र आपले निर्णय योग्यच आहेत आणि ते सर्वांनी मान्य करावेच असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. यासाठी नव्या मंत्र्यांचा परफॉर्मर्स, अडीच वर्षाचा कालावधी, पक्षात चांगले स्थान, मोठी जबाबदारी अशी काही गाजरे दाखवली आहेत उपलब्ध संख्याबळचा वापर करताना कोणाचीही बार्गेनिंग पॉवर वाढू दिलेली नाही. त्याबरोबरच समजूत काढू, संयम ठेवा, पक्षाच्या आणि नेत्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा पुन्हा संधी नाही. असे निर्वाणीचे इशारेही देताना नाराजांनी वेगळा निर्णय घेतला तरी त्याचा सरकारवर, पक्षावर, नेत्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. असेही सुनावले आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत काही बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
भाजपमधील जेष्ठ नेते, मंत्री राहिलेले सुधिर मुनगुंटीवार यांना मंत्रीपद मिळाले नसल्याचे जेवढे दुःख झाले त्यापेक्षाही दिल्लीला पाठवलेल्या यादीतून आपले नाव काढून टाकणाऱ्याचा राग जास्त आला आहे आणि तो त्यांनी बोलून दाखवला. त्यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पक्षाची चांगली जबाबदारी देणार असल्याचे सांगीतले पण त्यांची उघड नाराजी कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे आले, ओबीसी समाजाचे नेते म्हणून आपली नवी प्रतिमा तयार केली. यासाठी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यानां थेट अंगावर घेतले. पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम केले. त्यांचे मंत्रीपद जाईल असे कोणालाच वाटले नव्हते. स्वतः भुजबळ यांनी आपली नाराजी, संताप, उद्वेग थेट व्यक्त केला. ते शपथविधी सोहळ्यासाठी गेले नाहीत. अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. कोण वरिष्ठ? असा संतापजनक प्रश्न केला. मी नसल्याने काही फरक पडणार नाही. असे सांगताना जहाँ नही चैना व वहाँ नही – – – ! अशी हतबलता व्यक्त केली. तरीही त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप दाखवला. भुजबळ यानींही आपले इतर मार्ग शोधण्यास सुरवात केली.
दिपक केसरकर यांनी शिंदे गटात अप्रत्यक्ष जेष्ठत्वाची, प्रवक्त्यांची, कारभाऱ्याची भूमिका बजावली. एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळचे अशी प्रतिमा निर्माण केली. तरीही त्यांचे मंत्रीपद जाणे मुंबई, कोकण परिसरात चर्चेचा विषय ठरली. त्यांनी आपल्याला मंत्रीपद नाही हे समजताच शपथविधी, अधिवेशन सोडले आणि शिर्डीत जाऊन साईंच्या चरणी लीन झाले. प्रतिक्रिया सावधपणे दिली. तरी चेहरा आणि देहबोलीतून बरेच काही व्यक्त झाले. अर्थातच एकनाथ शिंदे यानी ‘श्रद्धा आणि सबुरी’ चा सल्ला ( की इशारा–) दिलाच.
महायुतीचे घटक म्हणून सदाभाऊ खोत, रवी राणा, नवनीत राणा यानी महाविकास आघाडीवर आणि नेत्यांवर आक्रमक टिका केली होती. त्याचे फळ मिळेल अशी त्यांना खात्री होती पण तांदळातून खडे काढावेत तसे त्यांना बाजूला टाकले. नाराजी आणि हतबलता व्यक्त करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही. नवनीत राणा यांनी “जिंदगी है, समंदर को क्या कम है वो बता भी नही सकता..” असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती व्यक्त केली.
गोपीचंद पडळकर यांनी स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणून प्रेझेंट करताना राष्ट्रवादी आणि शरद पवार यानां ज्या भाषेत लक्ष्य केले ते कोणालाही रुचण्यासारखे नव्हतेच. अजित पवार यानां ते रुचले नसणारच. तरीही त्यांना निवडणूकीत यश मिळाल्याने त्यांनी भारावून मंत्रीपदाची आस धरली. त्यांचा भ्रमनिरास झाला. त्याचे खापर मात्र त्यांनी शिंदे, अजित पवार यांच्यावर फोडले. आ. संजय कुटे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट फडणवीस यांच्यावर राग काढला. विजय शिवतारे यानी संताप व्यक्त करताना पुढच्या अडीच वर्षात मंत्रीपद दिले तरी घेणार नाही अशा भाषेत राग व्यक्त केला. तानाजी सावंत रूसून नागपूर सोडून पुण्यात आपल्या कार्यलयात येऊन बसले. अर्जुन खोतकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
सत्तारूढ महायुतीतील नेत्यांच्या पसरलेल्या नाराजीचे पडसाद राज्यभर पसरले आहेत. महायुती राज्यात, केंद्रात, सत्तेवर आहे. नाराजानां देण्यासारखे भरपूर आहे. दिले तर ते घ्यायचे की नाही ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. पण ही तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ना काही देऊ, चांगले पद देऊ अशी मधाची बोटे लावण्याचे काम सुरू आहे. पण यातून वातावरण शांत करण्याचाच उद्देश दिसून येत आहे. त्यामुळे नाराज नेत्यांची पुढील भुमिका काय असेल याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
