गाजावाजा न करता सत्यजित पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित बाबासाहेब पाटील सरुडकर(आबा) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कसलेही शक्ती प्रदर्शन किंवा रॅली न काढता हातकणंगले मतदारसंघातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक शिवसेनेचे उपनेते संजय पवार काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे या नेत्यांना घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.
कोल्हापुरात एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे शाहू महाराज भव्य रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दुसऱ्या बाजूला हातकणंगले मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचेच उमेदवार असलेले सत्यजित पाटील सरूडकर हे काही नेते कार्यकर्त्यांसहजिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि महत्त्वाच्या नेत्यांना बरोबर घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माध्यमांशी सत्यजित पाटील म्हणाले की हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीचे चांगले नेटवर्क आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मनापासून प्रचार करीत आहेत. मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.
अनपेक्षितपणे उशिरा महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघात भेटीगाठी आणि प्रचार सुरू केला आहे. सहा तालुक्यातील संपूर्ण गावांना भेटी देऊन मतदारांपर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान असल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शनाचे नियोजन केले नाही. त्यांच्या विरोधात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले. आणि त्यांनी महायुतीतील काही नेत्यांची नाराजी दूर करून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत सहभागी करून घेतले. असे असतानाही सत्यजित पाटील यांनी मात्र संपूर्ण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गाठीभेटी आणि सभा मेळाव्यावरच भर दिला आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील माजी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले, जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांच्यासह निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
