ए. वाय. पाटलांना डच्चू; राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना पदावरुन हटविले. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पंडितराव पाटील-आसुर्लेकर यांच्याकडे सोपविली आहेत.
ए. वाय. पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधी पॅनेल करुन निवडणूक लढवली. याबाबत ना. मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याचे परिणाम भोगावे लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. तर ए. वाय. पाटील हे गेले काही दिवस जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत होते. तसेच ते पक्षातही फारसे सक्रिय दिसत नव्हते. अखेर पक्ष पातळीवर फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांची उपस्थिती होती. ए. वाय. पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरुन दूर केले आहे. अलीकडे त्यांचा कल भाजपकडे होता. पण महायुतीचा घटक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष झाला आहे. यामुळे ए. वाय. पाटील यांची पुढील भूमिका काय असणार ? याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि जिल्ह्याचे आणि लक्ष लागले आहे.
