राज्यातील रेल्वेच्या समस्याबाबत खा. महाडिक रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा
नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. कोल्हापूर- मुंबई मार्गावर पुढील दोन महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. मुंबई- कोल्हापूर – मुंबई या मार्गावर धावणार्या महालक्ष्मी एक्सप्रेसला प्रवाशांचा नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना महालक्ष्मी एक्सप्रेसचे आरक्षणही मिळत नाही. तर संह्याद्री एक्सप्रेस अजूनही केवळ पुण्यापर्यंत धावते. अशावेळी मुंबई – कोल्हापूर मार्गावर सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. या मागणीसाठी खासदार महाडिक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचाच आणखी एक टप्पा म्हणून, आज खासदार महाडिक यांनी, रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊन, पुढील दोन महिन्यात कोल्हापूर – मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी; जेणेकरून कोल्हापूर, सांगली, सातारा या तीनही जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोल्हापूर मुंबईचे अंतर कमी वेळात गाठता येईल, असे मुद्दे निदर्शनास आणून दिले. शिवाय सध्याच्या महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने झाले आहेत. हे कोचेस ताबडतोब बदलावेत आणि नवे आधुनिक – आरामदायी कोचेस महालक्ष्मी एक्सप्रेसला जोडावेत, अशी मागणी करण्यात आली. सध्या अहमदाबाद आणि दिल्ली या शहरांसाठी कोल्हापुरातून आठवडयातून एकच रेल्वे सुटते. यापुढे अहमदाबाद आणि दिल्लीसाठी आठवडयातून तीनवेळा गाडया सोडाव्यात, तसेच मिरज-कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तातडीने काम सुरू व्हावे, अशा मागण्या खासदार महाडिक यांनी केल्या. त्याला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मिरज-कोल्हापूर रेल्वे दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजूरी देवू आणि निधीची तरतुद करू. शिवाय लवकरच कोल्हापूर मुंबई मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल, असे नामदार दानवे यांनी खासदार महाडिक यांना सांगितले.
