महायुतीचे धैर्यशील माने विजयी : मविआच्या सरूडकराना पराभवाचा धक्का
कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातील मतमोजणीत सुरुवातीच्या काही फेऱ्यात आघाडीवर असलेले महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील आबा सरूडकर यांना शेवटच्या फेऱ्यात अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. या ठिकाणी महायुतीच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने १४७०० च्या मताधिक्यांनी विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असताना शिवसेना ठाकरे गटाला ही जागा गमवावी लागली. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही पराभव झाला. ते तिसऱ्या क्रमांकावर गेले.
हातकणंगले मतदारसंघात चौरंगी लढत झाली तरी अटीतटीचा सामना शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारातच झाला. महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. सत्यजित पाटील यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन प्रचाराचे रान उठवले होते. याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा झालेल्या. यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. तर धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातील वारंवारचे दौरे, यातून महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याकडून धैर्यशील माने यांच्यासाठी जोडण्या लावण्यात आल्या. या जोडण्या धैर्यशील माने यांच्यासाठी फायद्याच्या ठरल्या.
सकाळी राजाराम तलावाजवळील हॉलमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. १४ टेबलवर विधानसभा मतदारसंघनिहाय १९ ते २४ फेऱ्यात मतमोजणी घेण्यात आली. सुरुवातीच्या ७ फेऱ्यात सत्यजित पाटील थोड्याशा मताने आघाडीवर होते. पण प्रामुख्याने हातकणंगले, इचलकरंजी या दोन विधानसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांनी चांगली आघाडी घेतली. शाहूवाडी-पन्हाळा या सत्यजित पाटील यांच्या मतदारसंघात ही माने यांना चांगली मते मिळाली. वाळवा शिराळा आणि शिरोळ या मतदारसंघातही त्यांना समाधानकारक मते मिळाली आणि अखेरच्या टप्प्यात त्यांना १४७०० चे मताधिक्य मिळाले आणि ते विजयी झाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेत लढत देऊन दोन लाख मते मिळवली. तर वंचित बहुजन आघाडीतील डी.सी. पाटील यांनाही चाळीस हजार मते मिळाली. पराभवाच्या छायेत असलेल्या धैर्यशील मानेंच्या आणि महायुतीच्या गटात दिवसभर सन्नाटा होता. पण अचानकपणे पारडे फिरले आणि धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी धाव घेऊन जल्लोष केला.
