महायुती, मविआतील घटक पक्षांच्या नाराजीचा संघटनेच्या डॉ. मिणचेकरांना फायदा होणार ?
शिरोली : विधानसभेच्या निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून जनसुराज्यचे अशोकराव माने, मविआकडून काँग्रेसचे आ. राजूबाबा आवळे यांना उमेदवारी मिळाली आहे. या दोन्ही उमेदवारांनी घटक पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांना गृहीत धरून प्रचार सुरू केल्याने दोन्हीकडे उघड नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच आता महापरिवर्तन आघाडी कडून शेतकरी संघटनेत प्रवेश करून रिंगणात आलेल्या माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे दोन्ही कडील नाराजीचा डॉ. सुजित मिणचेकर यांना फायदा होऊन त्यांच्या मताची बेरीज वाढू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेले अशोकराव माने यानां आता महायुतीतील जनसराज्यकडून उमेदवारी मिळाली असली तरी ते ५ वर्षात जनसंपर्क ठेवताना आपली उमेदवारी भाजपकडून असेल असेही ते वारंवार सांगत होते. जनसुराज्यचे नेते आ. विनय कोरे यांनी हा मतदारसंघ महायुतीमध्ये आपल्या पक्षाला मिळवला. लोकसभेत महायुतीच्या नेत्यांच्या एकीचे फळ मिळालेच आहे. तसेच आताही मिळेल म्हणून अशोकराव माने यांनी प्रचार करताना शिवसेना शिंदे गट, भाजप या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांना गृहीत धरले आहे. यातूनच नाराज झालेल्या भाजपच्या जुन्या निष्ठावंतांचे दोन मेळावे झाले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना या मतदारसंघात पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि कमळ हे चिन्ह नाही याची खदखद आणि माने यांच्याबद्दल उघड नाराजी या मेळाव्यात व्यक्त झाली. काही बैठकांमध्ये माने यांना भाजप कार्यकर्त्यांनी अडवलेही. शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्या भेटीसाठी गेलेल्या अशोकराव माने यांच्याशी कार्यकर्त्यांनी वाद घातला. यामुळे माने यांची कोंडी झाली.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या पेठ वडगाव मध्ये झालेल्या मेळाव्यात काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजूबाबा आवळे न बोलवता गेले. याबद्दल काही शिवसैनिकांनी नापसंती दर्शवली. याबरोबरच परस्पर फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार सुरु केल्याबद्दल जाब विचारला. यामध्ये या मतदारसंघात शिवसेनेची ताकत असल्याने मेरिटवर शिवसेनेचा उमेदवार असावा अशी अपेक्षा होती. पण ते झाले नाही. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार डॉ सुजित मिणचेकर पक्ष सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षात गेले आणि तिथून उमेदवारी घेतली. शाहूवाडीत काँग्रेसचे नेते अमर पाटील, करण गायकवाड हे शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या विरोधात उघड प्रचार करतात याबद्दलही संतप्त भावना व्यक्त केल्या.
या पार्श्वभूमीवर आता नाराजांच्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. महापरिवर्तन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून उमेदवारी घेऊन रिंगणात असलेल्या डॉ. सुजित मिणचेकर यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असून ही सहानुभुतीची लाट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात नाराज शिवसैनिक, बौद्ध समाज, जैन समाज, शेतकरी संघटना यांची मतेही डॉ. मिणचेकर यांच्या पारड्यात पडणार आहेत. तसेच आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी राजू शेट्टी यांचे समवेत घेतलेल्या भेटीतून त्यांना जरांगे पाटील यांनी पाठिंबा व्यक्त केला तर डॉ. मिणचेकर यांच्यासाठी ती मते बोनस ठरणार आहेत. त्यामुळे मिणचेकरांच्या उमेदवारीबाबत गंभीर नसलेल्या दोन्ही आघाडीतील नेत्यांची आता चिंता वाढत आहे.
