कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते पी. एन. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : करवीरचे आमदार पी एन पाटील यांचे आज पहाटे निधन झाले. रविवारी घरी असतानाच ते बाथरूम मध्ये तोल जाऊन पडले आणि डोक्याला इजा झाली. त्यामुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव सुरू झाला होता. तातडीने त्यांना कोल्हापुरातील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोल्हापूर, मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पण त्यांना यश आले नाही. अखेर त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली.
आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य लोकांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. त्यानंतर हॉस्पिटलच्या वतीने त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत आणि प्रकृतीबाबत माहिती दिली होती. त्यावेळी डॉक्टरनी उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले होते. तसेच हॉस्पिटल मधील आणि जिल्ह्यातील काही तज्ञ डॉक्टर तसेच मुंबईहूनही खास विमानाने आलेल्या काही तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.
परदेश दौऱ्यावर असलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह काही राजकीय नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनीही आ. पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीची वारंवार माहिती घेऊन उपचारा बाबत सूचना दिल्या होत्या. आ. पी एन पाटील यांचे पुत्र राहूल पाटील आणि राजेश पाटील सर्वांच्या संपर्कात राहून माहिती देत होते. आमदार सतेज पाटील आपला परदेश दौरा अर्धवट सोडून कोल्हापुरात दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच त्यांचे स्वीय सहाय्य्क मंगेश चिवटे यांच्यामार्फत हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेऊन उपचाराबाबत आवश्यक ते प्रयत्न करावे त्यासाठी लागेल ते यंत्रणा उभी करा अशा सूचना दिल्या होत्या. गरज लागल्यास मुंबईला हलवण्याच्या आणि त्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सची सोय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जिल्ह्यातील आणि करवीर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांचा जीवदान मिळावे यासाठी देवाला साकडे घातले होते. तसेच काही पूजाही आणि होम हवनही केले. पण अखेर हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुःखाची छाया पसरली. आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव सकाळी दहा वाजता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आवारात दर्शनासाठी आणण्यात येणार असून या ठिकाणी दर्शनानंतर त्यांचे त्यांचे मूळ गाव असलेल्या सोडोली खालसा या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काँग्रेसवर अपार निष्ठा, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक वर्षे चेअरमन, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषवलेले आमदार पी.एन.पाटील यांचा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राजीव गांधी, सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी यांचेशी निकटचे संबंध होते. राज्यपातळीवरील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांशी मैत्री होती. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा नियमित थेट संपर्क होत असे. त्यांनी कधीही आपली कार्यकर्त्यांची असलेली नाळ तुटू दिली नव्हती. कोणाशीही त्यांचा फोनवर किंवा थेट संपर्क होत असे. तसेच प्रत्येकाचे काम समजून घेऊन त्याचा त्वरित निपटारा करणे ही त्यांच्या कामाची पद्धत होती. त्यामुळे त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला प्रत्येक कार्यकर्ता हा समाधानी होत असे. पक्षनिष्ठेबरोबरच तत्वनिष्ठा ही सर्वाना ज्ञात होती.
माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, आणि आमदार पी. एन. पाटील या त्रिमूर्तीनी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपला अनेक वर्षे वेगळा धबधबा निर्माण केला होता. या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देऊन मोठे केले. यामध्ये पी. एन. पाटील यांची परखड, निस्वार्थ आणि शिस्तबद्ध भूमिका महत्त्वाची ठरली होती. करवीर विधानसभा मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार झाले तरी त्यांना दोन वेळा पराभवाने सामोरे जावे लागले पण त्यांनी कधी सर्व सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क आणि सामाजिक कार्य यात खंड पडू दिला नाही.
<span;> नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. शाहू महाराजांना निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयार करणे, पुढील रणनीती, यासह त्यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या. अखेरच्या टप्प्यात त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता.विशेषतः सांगरुळ, यवलूज-पडळ आणि कोल्हापूर शहरातील सभा प्रभावशाली ठरल्या.
असा कोल्हापूरातील स्वच्छ चारित्र्य, आणि तत्वनिष्ठ राजकारणी नेता अचानक हरपल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
