हातकणंगलेत राजू शेट्टींच्या हट्टवादी भूमिकेने महाविकास आघाडी अस्वस्थ
कोल्हापूर (विजय पोवार) : ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघात लोकसभेच्या मैदानात उतरत आहेत. तरीही केंद्रात भाजप, राज्यात महायुती, हातकणंगले मध्ये गद्दारांचा पराभव करायचा असेल तर मला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असा त्यांचा आग्रह आहे. पण हे करीत असताना सर्वांनी माझ्या मागून फरफटत यावे अशी राजू शेट्टी यांची
दुराग्रही भूमिका सामान्य मतदारांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा स्वाभिमान दुखावणारी ठरत आहे. ज्यांचा पाठिंबा घ्यायचा त्यांना भेटण्याचे किंवा साधा संपर्क साधण्याचे औचित्य राजू शेट्टी पाळत नाहीत. त्यामुळे राजू शेट्टीसाठी करायचे तर का करायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. यातूनच हातकणंगलेसाठी महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे.
निवडून येण्याच्या क्षमतेवर राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी पसंती दर्शवली, फक्त त्यांनी महाविकास आघाडीत यावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर यामध्ये चूक काय? पण राजू शेट्टी एका बाजूला ‘एकला चलो रे’ म्हणतात. दुसऱ्या बाजूला हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने ते फक्त उद्धव ठाकरेंचीच भेट घेतात. तेथेही मला सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढेच ‘टुमणे’ लावतात. घटक पक्षातील राज्य आणि स्थानिक पातळीवरील कोणालाच विचारत नाहीत. इतकी हट्टवादी भूमिका घेऊनही महाविकास आघाडी राजू शेट्टींसाठी तिष्ठत आहे हे विशेष आहे.
राजू शेट्टी यांचा गेल्यावेळी धैर्यशील माने यांनी पराभव केला. शिवसेना पक्ष, मराठा कार्ड, नवा चेहरा, आक्रमक भूमिका, वक्तृत्व याचा फायदा धैर्यशील माने यांना झाला. तसेच राजू शेट्टी यांच्या चळवळीच्या पलीकडे खासदार म्हणून मतदारसंघात प्रभाव पडला नाही. उपयोग झाला नाही. त्याचाही परिणाम राजू शेट्टींवर झाला. आता परिस्थिती बदलली असली तरी राजू शेट्टीच्या दुराग्रही भूमिकेमुळे पर्याय शोधणाऱ्या आघाडीच्या नेत्यांना वरिष्ठाकडून सध्या सबुरीचा सल्ला दिला आहे. तरीही पक्ष नेतृत्वाचे, आघाडीचे अवमूल्यन करून राजू शेट्टीच्या मागे फरफटत जायचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक जवळ आली आहे. वेळ कमी आहे. सत्ताधारी महायुती आणि भाजप सावध पावले टाकत आहे. यातून धैर्यशील माने यांचे नाव मागे पडत आहे. धैर्यशील मानेही उमेदवारी मिळवण्याचा शेवटचा ‘लटका’ प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये आता शौमिका महाडिक यांचे नाव पुढे येत आहे. त्याना चांगला प्रतिसादही मिळत आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कायमच जातीनिहाय राजकारण, आणि मतदानाची परंपरा आहे. मराठा, जैन, लिंगायत, दलित आणि मुस्लिम समाजाने आपापली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. गेल्यावेळी ‘वंचित’ ने घेतलेली सव्वा लाख मते अर्थातच दलित-मुस्लिम समाजाचीच आहेत हे तितके स्पष्ट आहे. आताही या समाजाला भाजप किंवा महायुती बरोबर जायचे नसले तरी सक्षम पर्याय हवा आहे.
राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते आहेत. चळवळीतून ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार झाले पण नंतर ते पराभूतही झाले. म्हणजे सर्वच शेतकरी त्यांचे मतदार आहेत असे नाही. शेतकरीही इतर कोणत्यातरी राजकीय पक्षाशी बांधील आहे. जैन, लिंगायत समाजाचा ओढा राजू शेट्टीकडे निश्चितच आहे. पण त्यांना अडवण्यासाठी भाजपकडे आवाडे, कोरे यांचे सक्षम नेतृत्व तयार आहे. शौमिका महाडिक यांचा रूपाने आणखी एक मराठा चेहरा हातकणंगले मतदारसंघात पुढे आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. हे सर्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून सामूहिक आणि मनापासून प्रयत्न करावे लागणार आहे. राजू शेट्टी आणि महायुतीचा कोणीही उमेदवार असला आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, वाळवा, शिराळा या विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ठरवून एक सक्षम उमेदवार दिला तर राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे त्यामुळे हा उमेदवार निवडून आणू शकतात.
सध्या महाविकास आघाडीचे नेते जसे अस्वस्थ आहेत तसेच नाराजही आहेत. मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. गद्दारांना धडा शिकवायचा आहे. तरीही मतदार संघाचा अभ्यास आणि सर्वांचे मनापासून काम होणे आवश्यक आहे. नाहीतर हटवादी भूमिकेतून ‘जुलमाचा रामराम करायला लावणे’ महाविकास आघाडीला धोक्याचे ठरू शकते.
