हातकणंगलेत चौरंगी लढत; शिवसेनेकडून माजी आ. सत्यजित पाटील यांना उमेदवारी
                कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आपली ‘एकला चलो रे’ ची भूमिका कायम ठेवल्यामुळे अखेर शिवसेनेने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर केला.  शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.  याबाबतची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत केली. राजू शेट्टी यांनी आपला निर्णय देण्यास विलंब केल्यामुळे वंचित आघाडीकडूनही माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता या मतदारसंघात चौरंगी लढत निश्चित झाली आहे.
महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी केलेल्या गद्दारीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी राजू शेट्टी यांना पहिली पसंती दिली होती. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केले होती. पण त्यांनी फक्त पाठिंबा द्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त केली. अखेर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना महाविकास आघाडीचा घटक पक्षात यावे. आणि शिवसेनेचे मशाल चिन्ह घ्यावेच असा आग्रह धरला. यातून तडजोडीच्या वाटाघाटी फिसकटल्या आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी सत्यजित पाटील यांची निवड केली आहे.
शिवसेना आणि वंचित आघाडीच्या उमेदवारीचा फटका राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
