हातकणंगलेत काँग्रेसचे राजू आवळेच : महायुतीचा डॉ. मिणचेकरांवर डोळा?
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी हातकणंगले राखीव मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर केली. महायुतीतून मात्र अजूनही उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या ठिकाणी भाजपकडून कोणी इच्छुक नाही. जनसुराज्यचे अशोकराव माने यांचे नाव निश्चित केले असताना आता त्यांनाही पर्याय शोधण्याचे काम भाजप, शिंदे शिवसेनेकडून सुरू आहे. यातून इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा अलका स्वामींच्या नावाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या पावित्र्यात असलेल्या माजी आ.डॉ.सुजित मिणचेकर यांचा नावाची चर्चा महायुतीत सुरू आहे.
गेल्या वेळी या मतदारसंघात काँग्रेसचे राजूबाबा आवळे, शिवसेना-भाजप युतीचे तत्कालीन आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि जनसुराज्यचे अशोकराव माने यांच्यात लढत झाली होती. आमदार असुनही सहकारी पक्ष असलेल्या भाजपसह शिवसेनेच्याच काही नेत्यांच्या दगाबाजीचा फटका डॉ.सुजित मिणचेकर यांना बसला आणि काँग्रेसचे राजूबाबा आवळे निवडून आले. जनसुराज्य अशोकराव माने तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
यावेळी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत आणि विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी हे सूत्र असल्याने राजूबाबा आवळे यांना मआविची उमेदवारी मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. सुजित मिणचेकर बाजूला फेकले गेले. तर नव्या महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य पक्ष एकत्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे येथे फारसे अस्तित्व नाही. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेना शिंदे गटाला मिळालेले यश महायुतीला अधिक बळ देणारे ठरले आहे. यामध्ये येथील भाजप, जनसुराज, शिंदे गट, महाडिक, आवाडे,यड्रावकर यांच्या एकीचे हे फळ आहे. हाच फॉर्मुला विधानसभेला वापरण्याचे धोरण महायुतीने आखले आहे. पण उमेदवार देताना केवळ निवडून येण्याची क्षमता नव्हे तर खात्रीच हवी. यावर चर्चा होताना गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अशोकराव माने यांच्या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच आता शेवटच्या क्षणी पर्यायी नावाची चर्चा सुरू आहे.
भाजप या ठिकाणी पक्षाचा उमेदवार देण्याबाबत फारसा उत्सुक नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र या ठिकाणी आपल्या शिवसेनेचा आमदार असावा असे वाटत आहे. त्यामुळे शिंदे गटांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पर्यायी नावात इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्ष अलका स्वामी यांचे नाव चर्चेत आले. म्हणजे ते खासदार धैर्यशील माने यांनी ते आणले. पण आयत्यावेळी दिलेल्या उमेदवाराला कितपत यश मिळेल याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. आहे तरीही खासदार माने अलका स्वामी यांच्यासाठी आग्रही आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून पर्यायांने मविआकडून उमेदवारी मिळाली नसल्याने बंडाच्या पावित्र्यत असलेले डॉ. सुजित मिणचेकर यांचेवर आता एकनाथ शिंदे यांचे लक्ष गेले आहे. त्यांची दहा वर्षाची आमदारकी, गोकुळचे संचालक पद, सततचा संपर्क, गेल्यावेळचा निसटता पराभव यामुळे स्वतः एकनाथ शिंदे डॉ. सुजित मिणचेकर यांचा विचार करीत आहेत. पण येथील आपला हक्काची जागा जाणार म्हणून जनसुराज्यचे नेते आ.विनय कोरे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांची अलका स्वामी आणि डॉ. मिणचेकर या दोघांच्याही नावाला सहमती नाही. अलका स्वामींचे नाव पुढे केल्याबद्दल त्यांनी खा. माने यांचेकडे नाराजीही व्यक्त केली आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीचा रोष मनात धरून खासदार धैर्यशील माने हे देखील डॉ. सुजित मिणचेकरांबाबत नकारात्मक भूमिका घेत आहेत. या सर्व घडामोडीत डॉ. सुजित मिणचेकर मात्र स्वतः अजूनही शिवसेना ठाकरे गटाशिवाय कोणाच्याही संपर्कात नाहीत. पण राजकीय भवितव्य अबाधित ठेवताना यशाची खात्रीच असेल तर बंडखोरी करून अपक्ष लढण्यापेक्षा महायुतीचा प्रस्ताव डॉ. सुजित मिणचेकर स्वीकारण्याची ही शक्यता निर्माण झाली आहे.
