हातकणंगलेत काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांची एकाकीच लढत
शिरोली : हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हणून राजू बाबा आवळे यांनाच पुन्हा संधी मिळणार हे निश्चित होते. त्यानुसार त्यांना ती मिळालीही. त्यांनी आमदार म्हणून शक्य तेवढा निधी विकास कामाला लावला. पण महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेल्या शिवसेनेच्या नेते, कार्यकर्त्यांचा मात्र त्यांनी विचारच केला नाही. त्यामुळे शिवसेनेचे काही ठराविक पदाधिकारी, थोडेसे सैनिक वगळता सर्व शिवसैनिक डॉ. सुजित मिणचेकर यांच्याकडे वळले. राष्ट्रवादी पवार गटाचे अस्तित्व नगण्य असल्याने त्याचा फारसा उपयोग होईल अशी स्थिती नाही. त्यामुळे आ. राजूबाबा आवळेंना स्वतःसाठी एकाकी लढत द्यावी लागत आहे. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आ. सतेज पाटील हे चांगली साथ देत आहेत तरीही राजू बाबा आवळे यांनी आपली स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा प्रचारात राबविली आहे.
गेल्या पाच वर्षातील पहिली अडीच वर्षे ते ठाकरे सरकारमध्ये सत्तेत होते. त्यानंतर महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये राहावे लागले. तरीही आ. राजूबाबा आवळेंनी आमदार फंड असो किंवा इतर माध्यमातून मिळणाऱ्या विकास निधी असो सर्व शंभर टक्के खर्च करून विकास करण्यामध्ये त्यांनी बाजी मारली आहे. त्या निमित्ताने मतदारसंघाशी त्यांचा संपर्क राहिला आहे. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळणार याची आ.आवळे यांना खात्री होती. म्हणजे शिवसेनेशी त्यांनी जमवून घेणे अपरिहार्य होते. पण त्यांनी शिवसेनेचा कधीही विचार केला नाही. काँग्रेस पक्ष आणि व्यक्तिगत पातळीवरच त्यांनी काम केले. महाविकास आघाडीतून पहिल्या यादीत आ. राजूबाबा आवळे यांचे नाव जाहीर झाले. दरम्यान शिवसेनेकडून मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा आणि डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू होता. तीही एक सल आमदार आवळे यांच्या मनात होती.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचार सुरू करताना त्यांनी शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांच्या अस्वस्थतेला त्यांना सामोरे जावे लागले. एक दोन बैठकीत तर त्यांना शिवसेनेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हतबल होऊन त्यांनी स्वतंत्रपणे जोडण्या लावण्यास सुरवात केली. माजी आमदार राजीव किसन आवळे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यासोबत आहेत. पण ते वगळता राष्ट्रवादीचे अस्तित्व कोठेच दिसत नाही. शिवसेनेला आघाडीधर्म. महायुती आणि भाजपला विरोध, निष्ठा, उद्धव ठाकरेंचा आदेश यांची आठवण करून देऊन आपल्या प्रचारात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. तरीही शिवसेनेचे काही मोजकेच पदाधिकारी आणि सैनिक आ. आवळेंसाठी सक्रिय झाले आहेत.
ही परिस्थिती पाहता आ. आवळेंसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केले. त्यातून जनसुराज्यमधून गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात असलेले खोचीचे अजय पाटील, संभापूरचे प्रकाश जिरंगे यांच्या गटाचा थेट पाठिंबा मिळवला. आ. आवळे यांनी शिंदे गटाचे खा. धैर्यशील माने यांचा अंतर्गत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याची चर्चाही बरीच झाली. त्याला कितपत यश आले ते आता प्रत्यक्ष मतातून दिसणार आहे. काँग्रेसची पारंपारिक मते आ.आवळेंनाच मिळणार आहेत. यामध्ये जातीय समीकरणात संपूर्ण मुस्लिम समाज, मातंग समाज यांच्या मताचाही समावेश आहे. गेल्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत दोन विरोधकांच्या मतांची विभागणी झाली होती. आवळेंना पडलेली मते ज्यादा झाली आणि ते विजयी झाले. आता काँग्रेसची मूळ मते सोडली तर दुसरे मोठे पॅकेज आवळे यांच्याकडे नाही. त्यामुळे उपलब्ध मतांमध्ये कोणत्याही मार्गाने भर टाकली तरच आ. राजूबाबा आवळेंना विजयाचा टप्पा गाठता येणार आहे.
