November 2, 2025

चौपदरीकरण कामात गडहिंग्लज, आजरा शहरात बायपास रस्ता करावा : खा. महाडिक

0
IMG-20231221-WA0234

कोल्हापूर : संकेश्वर ते आंबोली हा चारपदरी रस्ता बनवत असताना, गडहिंग्लज आणि आजरा शहराला बायपास करणारा रस्ता असावा, अशी मागणी खा. धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
संपूर्ण देशात नवीन रस्ते बांधणी किंवा महामार्गांचे चौपदरीकरण – सहापदरीकरण अशा कामांनी वेग घेतला आहे. राज्यसभेचे खा. धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. रेड्डी ते संकेश्वर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 एच म्हणून घोषित झाला असून, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील प्रवाशांची दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.

सध्या या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. संकेश्वर ते आंबोली या मार्गावर गडहिंग्लज आणि आजरा ही दोन तालुकास्तरीय गावे आहेत. या दोन्ही शहरातून महामार्ग गेल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊन, गडहिंग्लज आणि आजरा इथल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागेल. शिवाय दाट लोकवस्तीच्या गावातून महामार्ग नेणे, वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य होणार नाही. त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा चार पदरी रस्ता बनवत असताना, गडहिंग्लज आणि आजरा शहराला बायपास करणारा रस्ता असावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी ना. गडकरी यांच्याकडे केली. या मागणीचे पत्र ना. गडकरी यांना देण्यात आले. ना. नितीन गडकरी यांनीही खासदार महाडिक यांच्या मागणीबद्दल सहमती दर्शवून, सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे संकेश्वर ते आंबोली हा नवा रस्ता बनताना गडहिंग्लज आणि आजर्‍याला नवीन बायपास रस्ता तयार होईल, अशी खात्री खा. महाडिक यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page