हातकणंगलेतून लढणारही आणि जिंकणारही! : डॉ. सुजित मिणचेकर यांचा निर्धार
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून हातकणंगले मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढणारही आणि जिंकणारही! असा निर्धार शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केला. हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील एका हॉटेलमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, यांच्यासह पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनीही स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी ही लढाई लढलीच पाहिजे असा आग्रह धरतानाच प्रामुख्याने काँग्रेसच्या भूमिकेवर खरपूस टीका केली.
महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्याने उमेदवारीसाठी माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर गेले काही दिवस हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे यावा आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईत मातोश्री आणि सेनाभवनांवर सातत्याने चकरा मारत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आ. आदित्य ठाकरे, आ. भास्कर जाधव, खा. अनिल देसाई यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तरीही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे त्यांना उमेदवारीसाठी मिळण्याची शक्यता मावळली आहे. हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिक, पदाधिकारी यांना काँग्रेसकडून आणि विद्यमान आमदारांकडून मान, सन्मान,आणि न्याय मिळत नसल्याची तीव्र भावना आहे. याच भावना आज माजी आ. सुजित मिणचेकर यांनी बोलवलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आणि त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह केला.
हातकणंगलेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा चांगलाच प्रभाव आहे. डॉ. मिणचेकर हे येथून दोन वेळा आमदार झाले आहेत. याठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांची फळी आहे. महायुतीच्या उमेदवारला टक्कर देण्याची क्षमता आहे. डॉ. मिणचेकर यांचे आमदारकीच्या काळात आणि त्यानंतरही मतदारसंघात विकासात्मक काम आणि संपर्क यामध्ये सातत्य आहे. म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. या उलट महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस कडून शिवसेनेची आणि शिवसैनिकांची कायम उपेक्षा झाली आहे. लोकसभेला काँग्रेसकडून सत्यजित पाटील (आबा) यांना अपेक्षित सहकार्य झाले नाही. अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. माजी जि. प. सभापती प्रवीण यादव यांनी आमदार राजूबाबा आवळे यांनी विकासासाठी निधी तर दिलाच नाहीच पण छत्रपती शिवरायांच्या मिणचे येथील पुतळ्यालाही निधी देण्यास नकार दिल्याचे सांगितले. तर माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण यांनी काँग्रेसकडून शिवसेनेच्या हक्काचे आहे ते सर्व काही ओरबडून घेण्याच्या पद्धतीवर टीका करताना ‘माझं आहे तेही माझंच आणि दुसऱ्याचंही माझंच’ अशी नीती काँग्रेसचे नेते अवलंबत आहेत. असे सांगितले. जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वच नेत्यांनी डॉ. मिणचेकर यांना लढण्यासाठी मूकसंमती दिली असल्याचे सांगून यापुढे शिवसैनिकांनी आत्मसन्मानाचा लढा देण्यासाठी सज्ज व्हावे असे आव्हान केले. डॉ. सुजित मिणचेकर यांनी माझा लढा शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. मी लढलो नाही तर पक्ष आणि शिवसैनिक यांच्या अस्तित्वाचा प्रश्न प्रश्न निर्माण होईल आणि शिवसेना पक्ष संपून जाईल म्हणूनच मी लढा देत असल्याचे सांगितले.
यावेळी बाबासो शिंगे, पिंटू मुरूमकर, अनिल खवरे, राजू पाटील, संदिप पाटील, संदिप दबडे, विलास खोत, अशोक खोत, विजय भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
