विकासकामात राजकारण आणू नये – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपून जवळपास तीन वर्षे झाली. मात्र अजूनही काही माजी नगरसेवक हे महापालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत. विकास योजनेत कोणी राजकीय अडथळा आणून काम थांबवण्याचा खटाटोप केला तर त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. चुकीच्या पद्धतीने कोणी प्रेशर टाकत असेल तर त्याला बळी पडू नका.”अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. शहराचा विकासकामात कोणी राजकारण आणू नये असेही क्षीरसागर यांनी आवाहन केले.
कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, विकसक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत बोलताना क्षीरसागर यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, कचरा उठाव व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. गांधी मैदान सुशोभीकरण, रंकाळा तलाव सुशोभीकरण यासंबंधी ही चर्चा झाली. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत महापालिकेने सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करतो अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. येत्या दोन महिन्यांमध्ये ५०० हून अधिक रोजंदारी कर्मचारी हे कायम सेवेत होतील यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. कोल्हापूर शहराला रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाची वर्क ऑर्डर काढली असल्याचे प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
