कृष्णराजसाठी तिकीट मागितले नाही, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार! : खासदार महाडिक
कोल्हापूर : विधानसभेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून माझा मुलगा कृष्णराजसाठी तिकीट मागितलेले नाही. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहून त्याचा प्रचार करणार असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
यावेळी बोलताना खा. महाडिक म्हणाले जिल्ह्यात महायुतीचे सर्व दहाही उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर उत्तर मधून अद्याप कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडीला तर अजून उमेदवार मिळालेला नाही.या मतदारसंघात महायुतीचे प्रमुख दावेदार असलेले माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कृष्णराज महाडिक यांच्यासाठी उमेदवारी मागितली तर दक्षिण मध्ये अमल महाडिक यांचा पराभव करू असा इशारा दिला. तसेच त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांनीही आमच्या विरोधात वक्तव्ये केली. कोल्हापुर उत्तर हा मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा असला तरी तो नंतर काँग्रेसकडे गेला आणि त्यानंतर भाजपच्या वतीने सत्यजित कदम यांनी चांगली लढत देऊन तब्बल 80 हजार मते घेतली. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा आणि सत्यजित कदम यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले. शेवटी निर्णय मुख्यमंत्री शिंदे हेच घेणार आहेत. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांच्या परवानगीने मी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यावेळी माझा मुलगा कृष्णराज महाडिक याचीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घालून दिली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कृष्णराज यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्याच्याबद्दलची माहिती घेतली आणि ते त्याच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित झाले. यातूनच कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली आणि राजेश क्षीरसागर यांचा गैरसमज झाला.
राजेश क्षीरसागर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात आणि त्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. त्यांनी रस्ते, केशवराव भोसले नाट्यगृह. याबरोबरच इतर मोठे प्रकल्प यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे. सत्यजित कदम यांनीही भाजपच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात चांगले काम केले आहे. शासनाच्या अनेक योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम घेतले आहेत. याबरोबरच त्यांनी लोकसंपर्कही चांगला ठेवला आहे. सत्यजित कदम हे आमच्या महाडिक कुटुंबीयापैकीच एक असल्यामुळे त्यांच्यासाठी मी प्रयत्न केले. तरीही महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली तरी त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभे राहणार आहे. त्यांचा प्रचार प्रमुख म्हणूनच मी काम करणार आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करून एकमेकांना मदत केली पाहिजे. राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे यासाठी संयम राखून काम केले पाहिजे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचे राजकीय पुनर्वसन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठीही मी प्रयत्न करणार आहे असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. याबरोबरच गैरसमज करून घेऊन कोणी कोणतेही वक्तव्य करू नये असेही त्यांनी सांगितले.
