उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी
मुंबई : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले..
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भावोत्कट मनोगत व्यक्त करून भारत-जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे. मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. त्यामुळे बुद्धधम्माच्या प्रसारात असलेल्या या सर्वात जुन्या विद्यापीठाकडून सन्मान हा भावोत्कट क्षण आहे. या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
