कोल्हापूर जिल्ह्यातील मुश्रीफ, आबिटकर यांना मंत्री पदाची संधी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकार मध्ये कोल्हापूर जिल्हयाच्या वाट्याला दोन मंत्रीपदे आली आहेत. ६ व्यांदा कागल मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ हे तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान होत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले प्रकाश आबिटकर यांना प्रथमच राज्यमंत्री पदाची संधी मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणूकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवताना तब्बल २८८पैकी २३७ आमदार निवडून आणले आहेत. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपची संख्या १३३ इतकी असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. आता मंत्रीमंडळ विस्ताराची संपूर्ण राज्याला प्रचंड उत्सुकता होती.
कोल्हापूर जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे हसन मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. ६ आमदारांमागे एक मंत्री या सुत्रानुसार जिल्ह्याच्या पदरात एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्री निश्चित झाले आहे . मुश्रीफ यांच्या शिवाय जनसुराज्य पक्षाचे नेते आ. विनय कोरे . शिवसेनेचे आ . राजेश क्षीरसागर आणि आ प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत होती . यामध्ये आ आबिटकर यांनी बाजी मारली . त्यांना आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला या असा फोन आला त्यामुळे ते तातडीने नागपूरला रवाना झाले. राधानगरी, भुदरगड मतदारसंघ आणि या दोन्ही तालुक्यासाठी प्रथमच मिळणाऱ्या मंत्रीपदामुळे या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ. प्रकाश आबिटकर शिवसेना फुटीच्या वेळी शिंदे गटात गेले. त्यामुळे गद्दार म्हणून त्यांच्यावर टिका झाली पण त्यानी या टिकेकडे दुर्लक्ष करून विकास कामावर लक्ष केंद्रित केले. हजारो कोटी रुपयाची विकास कामे करून ते मोठ्या आत्मविश्वासाने निवडणूकीला सामोरे गेले. आणि ते तब्बल ३८०००च्या मताधिक्याने निवडून आले. मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे विधानसभेच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते तेंव्हा त्यांनी आ. आबिटकर यांच्या मंत्रीपदाचा शब्द दिला होता. आता मंत्रीपद देऊन त्यांनी शब्द पाळला.
कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून आमदार, खासदार,मंत्री होण्याची परंपरा मोठी आहे. हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर दोघांनीही याच परंपरेतून मंत्रीपदाची मजल मारली आहे.
