येत्या काही दिवसातच कोल्हापूर शहराची हद्दवाढ : ना. मुश्रीफ
कोल्हापूर – गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी आणि त्याला प्रस्तावित गावांचा होणारा विरोध या गर्तेत सापडलेला हा हद्दवाढीचा प्रश्न अवघ्या काही दिवसात सुटणार असल्याचे स्पष्ट संकेत खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होत नसल्याने विकास खुंटला असल्याची भावना शहरवासियांची आहे तर प्रस्तावित गावांचा हद्दवाढीला विरोध आहे. प्रश्न गेल्या ४० वर्षापेक्षा अधिक काळ हा प्रश्न प्रलंबित आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने अनेक वेळा राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला. परंतु ग्रामीण भागातून होणाऱ्या तीव्र विरोधकामुळे हद्दवाढ होऊ शकली नाही. परंतु आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय झाला असल्याचे सांगत येत्या काही दिवसात सहा गावची हद्दवाढ होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेतच सांगितले. कोल्हापूर शहराबरोबरच दक्षिण मतदारसंघातील कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कंदलगाव, सरनोबतवाडी या गावांचा या हद्दवाढीमध्ये समावेश होणार आहे. त्याचबरोबर दोन एमआयडीसी आणि ४१ गावांच्या हद्दवाढीच्या संदर्भात लोकसभा निवडणुकीनंतर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितलय. त्यामुळे हद्दवाढीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन हद्दवाढीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
