शिरोलीतील श्री शाहू दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध
शिरोली : शिरोली पुलाची येथील श्री शाहू सह. दूध व्यवसाईक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक महाडिक गट आणि श्री शाहू स्वाभिमानी आघाडी या दोन्ही गटात झालेल्या तडजोडीतून बिनविरोध पार पडली
श्री शाहू दूध संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर चार वर्षाहून अधिक काळ रखडली होती. सहकार उप निबंधक (दुग्ध) कार्यलयामार्फत निवडणूक अधिकारी म्हणून ए. ए. चिकणे यांच्या अधिपत्याखाली सर्वसाधारण गट १०, महिला २, अनुसुचित जाती १, अनुसुचित जमाती १, नागरीकांचा इतर मागास १, अशा १५ जागेसाठी निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही निवडणूक बीनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. माजी आ. महादेवराव महाडिक, आ. अमल महाडिक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक गटाकडून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि शिरोली वि. का. स. सेवा संस्थेचे चेअरमन सतिश पाटील, दिलीप कौंदाडे, दिलीप शिरोळे यांनी श्री शाहू स्वाभिमानी आघाडीचे नेते माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, शिवाजीराव पोवार पाटील, विजय पोवार यांच्याशी झालेल्या चर्चेत तडजोड करून एकूण १५ नावे निश्चित करण्यात आली. यातील नागरिकांचा इतर मागास गटातून नितिन चव्हाण, अनुसुचित जाती गटातून सर्जेराव पोवार, अनुसुचित जमाती गटातून सिद्धू पुजारी यांच्या विरोधात जादा अर्ज आले नसल्याने या बिनविरोध निवडी छाननी प्रक्रियेनंतरच निश्चीत झाल्या.
सर्वसाधारण आणि महिला गटात
काही जादा भरलेल्या उमेदवारांना फूस लावून काही विघ्न संतोषी लोकांनी या दोन गटात निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला पण विद्यमान संचालक मारूती मिसाळ यांचे नाव निश्चित केले असतानांही त्यांनी समजुतीची भूमिका घेत माघार घेतली. महिला गटातही रंजना पाटील यांना समजावण्यास दोन्ही गटातील नेत्यानां यश आले. यासाठी माजी उपसरपंच कृष्णात करपे, बाळासाहेब पाटील, सलीम महात, डॉ. सुभाष पाटील, संजय पाटील यांनी शिष्टाईचे यशस्वी प्रयत्न केले.
अखेर सर्वसाधारण गटात विद्यमान चेअरमन विजय वठारे, दिलीप कौंदाडे, मधुकर पद्माई, शामराव पाटील, अरुण पाटील, सागर संकपाळ, राजाराम करपे, बशीर देसाई, भगवान सावंत, रघुनाथ खोत, महिला गटातून शोभा यादव, संपदा उनाळे, नागरिकांचा इतर मागास गटातून नितिन चव्हाण, अनुसुचित जाती गटातून सर्जेराव पोवार, अनुसुचित जमाती गटातून सिद्धू पुजारी यांची निवड करण्यात आली. माघारीच्या अंतिम मुदतीनंतर बीनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
