हातकणंगलेत मिणचेकरांच्या जोडण्यामुळे सत्यजित पाटील यांना मिळणार मताधिक्य
कोल्हापूर : (विजय पोवार) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर (आबा) यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी व्यक्तिगत पातळीवर चार पावले पुढे जाऊन जोडण्या लावल्या आहेत. निष्ठावंत शिवसैनिक आणि डॉ. सुजित मिणचेकर यांचे विशेष प्रयत्न यामुळे सत्यजित पाटील यांना चांगले मताधिक्य मिळेल असे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीतून राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी निश्चित केली होती. त्यांचा ताठर भूमिकेमुळे शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या हातकणंगले मतदारसंघात पर्यायी नावाची चर्चा झाली. त्यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. उल्हास पाटील यांनी असमर्थता दर्शवली. तर पाटील, मिणचेकर यांची नावे चर्चेत राहिली. या दोघांनीही एकमेकांवर विश्वास व्यक्त करीत स्वतःसाठी अट्टहास केला नाही.
सत्यजित पाटील सरूडकर यांचे नाव पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्याला समर्थन देताना आपल्या कार्यालयासमोर फटाके वाजवून डॉ. सुजित मिणचेकर यांनी सत्यजित पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात केली. त्यानंतर सत्यजित पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म आणण्यासाठी डॉ. सुजित मिणचेकर स्वतः गेले होते. तसेच हातकणंगले मतदारसंघात जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांच्यासोबत प्रचाराची रणनीती आखताना स्वतःची उमेदवारी समजून नियोजन केले.
डॉ. सुजित मिणचेकर शिवसेनेचे माजी आमदार, गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक आणि खासदारकीसाठी महाविकास आघाडीतील चर्चेतील नाव. यामुळे या नावाला विशेष वलय निर्माण झाले. महाविकास आघाडीतील सर्व नेते, इतकेच काय विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचे विरोधी उमेदवार असलेले आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे यांच्याशीही त्यांनी सन्मानपूर्वक जुळवून घेताना कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली. प्रत्येक प्रचार मेळावे, सभा, फेऱ्या यामध्ये त्यांना सोबत घेतले. डॉ. सुजित मिणचेकर 2009 साली प्रथम आमदार झाले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढले. त्यांचे काम, संपर्क आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन असलेला लोक संपर्क यामुळे ते शक्य झाले होते. 2019 ला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल तरी त्यांनी शिवसेना, शिवसैनिक आणि हातकणंगले मतदारसंघाशी संपर्क जराही कमी केला नाही. त्याचा फायदा आता हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील यांच्यासाठी होणार आहे. बहुजन समाजाबरोबरच दलित, मुस्लिम समाजाशी त्यांनी संपर्कातून वेगळे नाते निर्माण केले आहे. याशिवाय प्रत्येक गावातील तरुण मंडळे,सामाजिक, सहकारी, शिक्षण संस्था, उद्योजक यांच्याशीही त्यांचा नेहमी संपर्क राहीला. त्यातून या निवडणुकीच्या निमित्ताने बैठका घेऊन सत्यजित पाटील यांच्यासाठी त्यांनी व्यक्तिगत जोडण्या लावल्या. शिवसेना ठाकरे गटाचे नूतन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्यासाठी हा खरा कसोटीचा काळ. पण डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासोबत गेले वीस वर्षे केलेले काम आणि संपर्क यामुळे संजय चौगुलेही जिल्हाप्रमुख म्हणून पहिल्याच परीक्षेत पास होणार हे निश्चित झाले आहे. डॉ. सुजित मिणचेकर, संजय चौगुले आणि त्यांचे सहकारी यांची मातोश्रीवर निश्चित दखल घेतली जाईल. यावेळी डॉ. सुजित मिणचेकर यांचा निस्वार्थ त्याग आणि परिश्रमाने त्यांचे पुढील राजकीय भवितव्य निश्चितच उज्वल होणार आहे.
