November 2, 2025

कोल्हापुरात मान, मत दोन्ही गादीलाच : शाहू महाराज विजयी

0
20240604_210508

कोल्हापूर : लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा तब्बल दिड लाखाहून अधिकच्या मताधिक्याने  विजय झाला. त्यांनी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. केंद्रातील मोदी सरकारचा कारभार, राज्यातील भाजपच्या नेत्यांचे फोडाफोडीचे राजकारण, कोल्हापूर जिल्ह्यातील अर्थकारण आणि दबाव यामुळे फुटलेल्या खासदार, आमदार याबाबत महायुती आणि एनडीए आघाडीवरील प्रचंड नाराजी कोल्हापूरच्या जनतेने आपल्या मतातून दाखवून दिली. महाविकास आघाडीतून विजयी झालेले श्रीमंत शाहू महाराज यांना ७,४०,०००इतकी मते मिळाली. तर विरोधी महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक यांना ५९००० इतकी मते मिळाली. श्रीमंत शाहू महाराज इतक्या दिड लाखाच्या मताधिक्यांनी विजयी झाले.
आज सकाळी आठ वाजता रमणमाळा येथील धान्य गोदामातील हॉलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 14 टेबलवर आवश्यक फेरीनुसार मतमोजणी घेण्यात आली. त्यानुसार चंदगड 28 राधानगरी 31 कागल 26 कोल्हापूर दक्षिण 24 करवीर 26 कोल्हापूर उत्तर 23 अशा फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. प्रथम टपाली आणि त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी करण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता होती त्यामुळे मतमोजणी केंद्रापासून न्यूज चॅनेल व्हाट्सअप सोशल मीडिया प्रेम मिळेल तिथून निकाल जाणून घेण्याची धडपड सर्वत्र दिसून येत होती.
सर्वच फेऱ्यात शाहू महाराज आघाडीवर राहिले.
प्रथम निकालाचा कल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निकाल स्पष्ट होताच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर जल्लोष सुरू केला.
श्रीमंत शाहू महाराज यांच्या नवीन राजवाड्याच्या परिसरात छत्रपती घराण्यातील माजी खासदार युवराज संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्यांनी स्क्रीन  खुर्च्या सह बैठक व्यवस्था केली होती. या सर्वांनी समर्थकांसह कोल्हापूर जिल्ह्याचा तसेच राज्य आणि देशातील निकाल जाणून घेतला.
कोल्हापूर मतदारसंघाचा कल स्पष्ट होताच जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मतदार यांनी नवीन राजवाड्याकडे धाव घेऊन श्रीमंत शाहू महाराज यांचे तसेच छत्रपती घराण्यातील संभाजीराजे, मालोजीराजे, संयोगीताराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यांचे अभिनंदन केले. तसेच गुलाल व रंगांची उधळण करीत डॉल्बीच्या तालावर जल्लोष केला.  श्रीमंत शाहू महाराज यांच्या विजयासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील  आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली होती रात्रंदिवस प्रचारासाठी फिरत होते. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश मिळाले  म्हणूनच आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा या त्यांच्या कार्यालयावर तितक्याच उत्साहात जल्लोष केला.
निकाल जसा स्पष्ट होत गेला तसा शाहू महाराज यांच्यासह सर्व छत्रपती घराण्यातील सदस्यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले. आणि निकालाबद्दल आनंद व्यक्त केला.
विजयी उमेदवार नूतन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना ‘हा छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा आणि जनतेचा विजय असून यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी केलेले प्रयत्न तसेच विशेष करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे विशेष आभार मानले याबरोबरच उद्धव ठाकरे, शरद पवार, व्ही. बी. पाटील यांचेही आभार मानले.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्याबद्दल त्यांनी ‘गड आला पण सिंह गेला’ अशा भावना व्यक्त केल्या. आणि खासदार म्हणून काम करताना  देश, राज्य आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नासाठी प्राधान्यक्रम ठरवून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. देशपातळीवर संविधान बचाव, स्थानिक पातळीवर पंचांगा प्रदूषण आणि आयटी क्षेत्र तसेच उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page